दिघी - पुणे राज्य महामार्गाचे ‘सुपरफास्ट ' काम ; नवा मार्ग पर्यटनासाठी ठरणार वरदान



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह 
दिघी - पुणे राज्य महामार्गाचे काम अत्यंत जलदगतीने सुरु असून काँक्रिटीकरणाचे काम दर्जेदार केले जात आहे . या राज्यमार्गाचे काम पनवेल येथील जे . एम . म्हात्रे इन्फ्रा प्रा . लि . यांनी हाती घेतले असून या मार्गावर असणारी गंभीर नागमोडी वळणे काढून जास्तीत जास्त सरळ रस्ता कसा होईल , याचा विचार करुन या मार्गाचे काम केले जात आहे . हा राज्यमार्ग येणा - या काळात निश्चितपणे पर्यटकांसाठी वरदान ठरणार असून या मार्गामुळे माणगांव तालुक्याचे महत्व वाढले आहे . माणगाव हे मुंबई - गोवा महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण आहे . मुंबई व पुण्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातून येणा - या पर्यटकांना या भागातील श्रीवर्धन , हरीहरेश्वर , दिवेआगर , मुरुड , काशिद बीच आदी पर्यटनस्थळी जाण्यासाठी माणगांववरुन जावे लागते . पूर्वी या पर्यटनस्थळी दिघी जाण्यासाठी अवघड वळणे असल्यामुळे वाहनचालकांना ते काम जिकरीचे होत असे . मात्र आता रस्ते विकास महामंडळाने दिघी - पुणे राज्य मार्गाला महामार्गाचा दर्जा देऊन या मार्गाचे काम हाती घेतले आहे . रस्ता रुंदीकरणाबरोबरच मार्गावर काही अंतरावर येणार असणारी अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकामे उठविण्यात आली आहेत . रस्त्याला लागून असणारी झाडे तोडण्यात येणार असून आवष्यक त्याठिकाणी पूल , साकव यांचा दर्जा सुधारुन हा रस्ता कसा भरभक्कम होईल , या दृष्टीने हे काम केले जात आहे . माणगांव शहरातून मोर्बा - रोड मार्गावरुन दिघीला जावे लागते . त्यामुळे मोर्चा रोड मार्गावर असणारी अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे काही दिवसांपूर्वीच उठविण्यात आल्याने आता माणगांवचे प्रवेशद्वार खुले झाले आहे , मोर्बा रोडला पूर्वी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे , ती आता निश्चितच दूर झाली आहे . जे . एम . म्हात्रे इन्फ्रा . प्रा . लि . यांच्या कामाचे विशेष करुन रायगड जिल्ह्यात नांव आहे . अनेक रस्ते त्यांनी जिल्ह्यात चांगल्याप्रकारे बनविले असल्यानेच त्यांना हे महत्वपूर्ण काम देण्यात आले आहे . या राज्यमार्गामुळे आता या भागातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटकांना आनंदाने जाता येणार आहे . म्हसळ्याजवळचा घोणसे घाट हा अत्यंद कठीण होता तो घाटाचा रस्ता अवघड वळणे व चढण काढून सुव्यवस्थित करण्यात आला आहे . त्यामुळे ही एक वाहनचालकांची डोकेदुखी आता दूर झाली आहे . मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गासारखा हा राज्यमार्ग होत असून लवकरच या राज्यमार्गाचे काम पूर्ण होऊन वाहनचालक व पर्यटक यांना हा मार्ग निश्चितच वरदान देणारा ठरेल यात शंका नाही . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा