खरंतर कोकणी माणूस स्वभावाने प्रेमळ, संस्काराने निर्मळ आहे. तो गावात समाजात सगळ्यांशी मिळून मिसळून राहतो. सामाजिक भान ठेवून जगत असतो. अगदीच कामानिमित्त कुठेही स्थिरलावला असेल तरीही कोकणच्या संस्कृतीक ठेव्याशी जोडलेली नाळ तो जपण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. आपल्या विभागात असे अनेक व्यक्तिमत्त्व आहेत जे 'विशेष' ठरतील. अश्याच एक विशेष व्यक्तिमत्त्वाला आम्ही बोलत केलंय. राजकिय व्यासपीठावर दिसणारे हे व्यक्तिमत्त्व सामाजिक जीवनातही तितकेच अग्रेसर आहेत. ते व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे 'महेश पांडुरंग शिर्के'. आपल्या गडदाव च्या जिल्हा परिषद शाळेत दुसरी पर्यंत शिक्षण घेऊन काही कौटुंबिक असचणींमुळे मुंबई गाठली ती कायमची. नाईट कॉलेज मधून पूर्ण केलेलं शिक्षण, ऑफिस पिऊन ते डायमंड कंपनी मध्ये उच्च पदस्थ अधिकारी. बालपणीच्या बिकट परिस्थितीवर केलेली मात, दोन टर्म रायगड जिल्हा समन्वय समितीवर केलेलं काम, राजकीय प्रवास आणि नोकरी करून राजकारण आणि समाजासाठी काढलेला वेळ... याबद्दल आम्ही जाणून घेतलंय महेश शिर्के यांच्याकडून...
बालपण कसं आणि कुठे गेल...?
खरंतर गडद मधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं दुसरीपर्यंत शिक्षण झालं आणि पुढील शिक्षणासाठी आम्ही मुंबईत आलो. खेतवाडीच्या म्युनिसिपल शाळेत तिसरी ते सातवी पर्यंत आणि मग आठवी ते दहावी गिरगावच्या रानडे विद्यालयात पूर्ण केली. माझ्या शिक्षणासाठी आमचे मोठे बंधू भावेश शिर्के यांनी आपलं शिक्षण सोडलं. दहावी पूर्ण झाली आम्ही गिरगावताच वाढलो. मुंबई सेन्ट्रल येथील महाराष्ट्र रात्र विद्यालयात ऍडमिशन घेतलं, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे दिवसा एका प्रायव्हेट ऑफिस मध्ये पिऊन ची नोकरी करता करता बारावी पूर्ण केली. मोठ्या भावाने माझ्यासाठी त्याच शिक्षण सोडलं होत म्हणून मी डिग्री पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि चर्चगेट च्या सेंट झेवीयर्स मध्ये ऍडमिशन घेतलं. आणि आयुष्यच बदलून गेलं. पुढे आम्ही कांदिवली ला राहायला गेलो.
काय सांगाल कॉलेज लाईफ बद्दल....
सेंट झेवीयर्स माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. नोकरी करत शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. तिथे फादर ऍरेल फर्नांडिस यांच्याशी ओळख झाली. इंग्रजी भाषेच ज्ञान मिळालं, ती शिकता आली. तिथेच सेंट झेंवीयर्स च्या मराठी वाङ्मय मंडळाती काही व्यक्तींशी ओळख झाली आणि कॉलेज लाईफ चा अर्थ कळला. तिथे विविध कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आणि स्टेज ची ओळख झाली आणि वागण्याबोलण्यातला कॉन्फिडन्स वाढला. आणि सोबतच प्रथमोपचार सर्जन चा course- मुंबई सिटी अंबुलनस कॉलेज - मारिन लाइन्स येथून पूर्ण केला
मग पुन्हा गावाकडे पर्यायाने कुणबी संघटनेशी कसे जोडले गेलात...?
1996 ला कुणबी संघटनेच्या माध्यमातून माझा सत्कार करण्यात आला. आणि मग तेव्हा पासून मीही त्या संघटनेत सहभागी झालो. मग 1998 ला गावी कुणबी युवा संघटनेची स्थापन केली आणि संदेरी मध्ये चाटे कोचिंग च्या शिक्षकांना मार्गदर्शनासाठी घेऊन गेलो. त्याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितच झाला आणि होतो आहे. आज आमच्या संदेरी चा SSC चा निकाल १००% असतो. दरम्यानच्या काळात कुणबी युवा संघटना वाढत होती त्यामुळेच म्हसळा तालुक्याच्या म्हसळा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या सदस्य पदी निवड झाली. २००९ ते २०१४ या काळात या शासकीय समितीत असताना शासकीय योजनांचा जवळून अभ्यास करायला मिळाला. आणि मग रायगड जिल्हा समन्वय समिती पुढे मग मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग या सहा जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या संघटनेच्या समितीवर दोन टर्म सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कृष्णकांत गजमल हे माझ्यासाठी आदर्श समाजात वावरताना वागावं कसं, आणि जगावं कसं याचं मार्गदर्शन मिळाले. समाजात वावरताना अशोक भोंड, अनिल काप, बबन उड्रे, श्रीपाथ थोपटे यांनीही विशेष सहकार्य केले. आमच्या कुणबी युवा संघटनेत अनेक विभाग आहेत. त्यापैकी रोजगार विभागामार्फत आम्ही तरुणांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या वैद्यकीय विभागात असलेले आणि वैदकीय श्रेत्रात विविध हॉस्पिटलमध्ये सेवा देत असलेले आमचे सहकारी विशेष सहकार्य करतात. kem मध्ये असलेले प्रदीप मोगरे सायन हॉस्पिटलमध्ये असलेले अरविंद ठमके, नायर चे महेंद्र टिंगरे आणि JJ चे अनंत काप त्या त्या हॉस्पिटलमध्ये एखादी अडचण निर्माण झाली की मदतीस सदैव तत्पर असतात. आमच्या शिक्षण विभागामार्फत ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरण शक्य नाही त्यांची वार्षिक फी आम्ही संघटनेच्या माध्यमातून भरतो. शिक्षणा पासून कोणीही वंचित राहू नये हाच यामगचा उद्देश.
राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल...?
खरंतर २००९ मध्ये म्हसळ्या च्या शासकीय समितीत असताना जाणीव झाली राजकारणात शिरल्या शिकाव विकास होणार नाही. विकास करून घ्यायचा असेल तर समाजाचा प्रतिनिधी राजकारणात असावा. मग राष्ट्रवादीचे मा. "मंत्री सुनील तटकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होत राजकीय प्रवास सुरु झाला. २०१६ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस म्हसळा मुंबई सचिव म्हणून काम पाहिलं आणि आता अध्यक्ष आहे. येणाऱ्या zp निवडणूकिसाठी विकासाच्या मुद्द्यांवर उभे राहणार आणि म्हसळेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार..
सध्या म्हसळ्यातील समस्यांवर आपलं मत काय...?
शिक्षण आणि आरोग्य सेवेवर भर देण्याची गरज आहे. दळणवळणासाठी च्या सोइ उपलब्ध व्हाव्यात. एखादी रिंगरूट सेवा सुरू करण्याची गरज आहे. सध्यापरिस्थितीत १४० विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतायेत त्यांना एस टी सेवा सुरळीत मिळावी. या १४० विद्यार्थ्यांसाठी केवळ एक एस टी धावते कुठेतरी फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. महाड सारख्या ठिकाणी एखादं मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू व्हावं.
तरुणांना काय सल्ला द्याल...?
राजकारणात जरूर या... त्यानेच विकास साध्य करता येईल. पण नोकरी, समाज आणि मग राजकारण केले पाहिजे. समाजात वावरत असताना राजकिय महत्वकांक्षा फक्त दोन दिवस असावी एक निवणुकीच्या दिवशी आणि नंतर निकालाच्या वेळी. इतर वेळी सगळ्यांशी मिळून मिसळून राहायला हवं. तरुणांनी रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार निर्मिती कशी करता येईल याकडे लक्ष द्यायला हवं. आणि महत्वाचं म्हणजे आपलं ते नेहमीच गल्ली क्रिकेट सोडून आता सिझन क्रिकेड कडे वळायला हवं, त्यासाठीच प्रशिक्षण घ्यायला हवं. गेल्या वर्षी झालेल्या रायगड जिल्हा स्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेत आपल्या विभागातील मुलांनी चांगली कामगिरी केली होती. आणि तेच सातत्य राखलं जावं नवीन मुलं या स्पर्धेसाठी तयार व्हावीत यासाठी लवकरच आम्ही म्हसळा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रशिक्षण सुरू करणार आहोत. असेच आपली शेती विकू नका ती आपली कमाई नाही.... वडिलोपार्जित असलेल्या शेतीला कसा... शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करा. आपल्या विभागात स्वदेश फाउंडेशन ही त्यासाठी कार्यरत आहे. त्यांची मदत घ्या . आम्हीही त्यांच्याशी संलग्न आहोत कुठे आमची मदत लागली तर आम्हालाही कॉल करा. सणासुदीला गावी जाऊन विकास होत नाही... गावाशी असलेलं नातं कायम ठेवा. वेळेचं नियोजन करा...
लवकरच आम्ही खेकडा पालन आणि मत्स्यव्यवसाय सुरू करीत आहोत. त्याबद्दल कोणाला माहिती हवी असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आजवरच्या या प्रवासात कुटुंबातील सर्वांनी छान साथ लाभली. फॅमिली
आई - लीलावती शिर्के, पत्नी- मृण्मयी शिर्के
मुलगी- भूमी नीरजा, मोठे भाऊ- भावेश शिर्के
वहिनी- भावना शिर्के, छोटे भाऊ- निलेश शिर्के
वहिनी-निधी शिर्के या सगळ्यांच्या साथीने हे शक्य झालय






Post a Comment