म्हसळा : प्रतिनिधी
तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात वसलेली ६ गावे ताम्हणे करंबेवाडी , ताम्हणे करंबे , रातिवणे , कोलवट , भापट गावांचा समावेश आहे त्या गावाला दळण - वळण करण्यासाठी प्रवासाचे साधन म्हणजे कोलवट रस्ता गेल्या १४ वर्षांपासून नादुरुस्त आहे . अनेक वेळा या गावातील ग्रामस्थांची विविध पक्षला रस्ता करण्यासाठी साकडे घातले . लेखी निवेदने , प्रस्ताव दिले . परंतु रस्ता आज आहे तसाच आहे . त्यामुळे आगामी निवडणुकांआधी जर रस्त्याचे काम केले नाही , तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे . कोलवट गावाअंतर्गत ६ गावे येतात यामध्ये ताम्हणे करंबेवाडी , ताम्हणे करंबे , रातिवणे , कोलवट , भापट या गावांचा समावेश आहे . या ६ गावांनी मुंबई ठिकाणी व ग्रामीण ठिकाणी पंचक्रोशी कमिटी स्थापन करून रखडलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला . आजपर्यंत अनेक निवडणुका येऊन गेल्या . प्रत्येक राजकीय पक्षाने आश्वासन दिले . परंतु , कोणीही आश्वासन पाळले नाही . त्यामुळे आजही रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे . या रस्त्यावरुन प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते . पावसाच्या दिवसात नादुरुस्त रस्त्यामुळे महामंडळ एसटी बसच्याफेऱ्या बंद करते . त्यामुळे ग्रामस्थांना दुप्पट किंमत मोजून खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो . अखेर ह्या सर्व प्रकरणाला कंटाळून पंचक्रोशीची पहिली सभा घेऊन कमिटी स्थापन करून आगामी काळात जो राजकीय पक्ष रस्ता करेल , त्याच पक्षाला पंचक्रोशीत स्थान दिले जाईल . नाही तर येणार्या निवडणुकीवर पंचक्रोशी भागातील सहा गावे बहिष्कार टाकतील , असा एकमुखी ठराव घेण्यात आला आहे .
आम्ही सर्व ग्रामस्थ गेली अनेक वर्षे रस्त्याला अक्षरशः वैतागलो आहोत . कारण निवडणुका आल्या की , ह्याच रस्त्याने राजकीय पक्ष आश्वासन देण्यासाठी धावत येत असतात परंतु , बाकी इतर दिवस वगळता ह्या रस्त्यावर कुठला राजकीय नेता फिरकूनदेखील बघत नाही . त्यामुळे आम्ही प्रत्येक पक्षाला प्रस्ताव सादर करणार आहोत .
- पंचक्रोशी कमिटी प्रमुख कोलवट
कोलवट रस्ता हा प्रमुख जिल्हामार्ग करण्यासाठी प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांच्याकडे सादर केला आहे . तो रस्ता जिल्हामार्ग होताच त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल . यासाठी मी स्वतः निधी मंजुरीसाठी प्रयत्न करीत आहे . ह्याविषयी मुख्यमंत्री ह्यांच्याकडे सविस्तर केली , हे काम अंतिम टप्यात आहे त्यामुळे कोलवट रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे .
- कृष्णा कोबनाक जिल्हा उपाध्यक्ष , भाजप
कोलवट रस्त्यासाठी जिल्हा परिषद व आ . अनिकेत तटकरेंच्या माध्यातून पाठपुरावा सुरू आहे . लवकरच या रस्त्याला मंजुरी मिळून कामाला सुरुवात करण्यात येईल.
- सुनिल तटकरे , राष्ट्रीय सरचिटणीस , राष्ट्रवादी काँग्रेस

Post a Comment