म्हसळ्यात सर्वधर्मियांनी एकत्रित केला जम्मू काश्मिर हल्ल्याचा निषेध



● तहसीलदारांना दिले निवेदन

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

           जम्मू-काश्मिरमधील पुलवामा या ठिकाणी दि.14 फेब्रुवारी रोजी भारतीय सैनिकांवर पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दि.15 फेब्रुवारी रोजी म्हसळा तालुक्यात सर्व धर्मियांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला आणि तहसिलदार श्री.रामदास झळके व पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांना निवेदन दिले. तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदू शिर्के यांनी या घटनेच्या निषेधार्थ आज म्हसळा बंदची हाक दिली यावेळी उपस्थित सर्वांनी म्हसळा बंदला दुजोरा देऊन एक दिवस म्हसळा बंद ठेवायचे ठरविले.
यावेळी म्हसळा ग्रामिण रुग्णालय ते तहसिल कार्यालयापर्यत मोर्चा काढून भारत माता की जय, हिंदुस्थान झिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबद, निम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है अशा घोषणा देऊन पाकिस्तानचा निषेध नोंदवला. तहसीलदार व पोलिसनिरीक्षक यांना निवेदन दिल्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच सर्व पक्षीय, सर्व धर्मीय संघटना व भारतीय नागरिक म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वैयक्तिक निषेध पत्र दिले. या मोर्चात हिंदू बांधवांसह मुस्लिम बांधवांनीही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन भारतीय एकतेचे दर्शन घडविले. शुक्रवारी मशिदीत मुस्लिम समाजाने नमाज अदा केल्यावर पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असे अलिशेठ कौचाली यांनी सांगितले व भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानात वाढदिवसाला जाणे बंद करावे असे सांगून या घटनेचा पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन बदला घ्यावा असे सांगितले. तर हिंदू समाज संघटना अध्यक्ष महादेव पाटील यांनी आम्ही सर्व भारतीय आहोत म्हणून या हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदवीत आहोत असे सांगून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी सतर्क राहिले पाहीजे असे सांगताना ज्या जवानांच्या घरी दुःखाचे डोंगर कोसळले आहे अशा जवानांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम प्रत्येक भारतीय नागरिकांनी केले पाहिजे असे आवाहन केले. तर आजचा पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला आजचा म्हसळा बंद हा शांततेच्या मार्गाने पाळण्यात येईल व यामधे सर्वांनी भारतीय नागरिक म्हणून सहभागी व्हावे असे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ते समिर बनकर यांनी केले.
यावेळी सर्वांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता. तसेच पाकिस्तानच काय इतर कोणत्याही देश भारताकडे वाकड्या नजरेने बघणार नाही यासाठी सर्वांनी एकत्र राहून भारतीय ऐक्यतेचे दर्शन घडविले पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी सर्वधर्मीय, सर्व राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटना, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा