दिघी : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील सर्वत्र माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात साजरा झाला . यानिमित्ताने तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती . मंगलमय व भक्तीपूर्ण वातावरणात एकत्रित समाज , एक विचार व एक उत्सव असे सामाजिक ऐक्य निर्माण करणारा श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावातील २३ वा माघी गणेशोत्सव यावेळी उत्साहात साजरा करण्यात आला . शुक्रवारी सकाळी आरतीपासून श्रींच्या पुजेला सुरुवात झाली . त्यानंतर दु . १२ वा . मंदिरामध्ये पाळणा बांधून जन्मोत्सव साजरा करण्यात आला . आरती , गणेशपूजन त्यानंतर मंदिरामध्ये महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले . उत्सव कार्यक्रमात पाहुण्यांसह सर्वच ग्रामस्थ एक वेगळा दिवस म्हणून भक्तिमय वातावरणात मग्न झाल्याचे दिसत होते . दर्शनाला आलेल्या प्रत्येकाला महाप्रसाद करून जाण्याचा आग्रह ग्रामस्थ करत होते . यावेळी मनोरंजन मेजवानी म्हणून प्रसिद्ध नाटक ' ऑल दि बेस्ट ' सादर करण्यात येणार होते . या उत्सवाद्वारे समाज प्रबोधन , सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे , याकरिता अखंड आगरी समाज व जाखमाता महिला मंडळ शिस्ते यांच्या संयक्त विद्यमाने विविध कार्यक्रम संपन्न झाले . प्रोत्साहित करण्यासाठी मंडळांकडून आजतागायत गावातील गरजूना रोजगार देण्याच्या योजना अंमलात आणण्यात आल्या . त्यानुसार शिस्ते ग्रामस्थांनी एकत्रित येत मागिल बावीस वर्षांपासून उत्सवात ५६० कुटुंबांनी सहभाग नोंदवला आहे . धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमही या मंडळांनी हाती घेतले आहेत .


Post a Comment