घुम गावातील भक्तनिवास इमारत बांधकामाची दुरावस्था 10 लाख खर्च कुठे केले नागरिकांचा सवाल

 

● माजी मंत्री सुनिल तटकरे यांच्या नावाची पाटी लावली नाही, उदघाटनही झाले नाही....?

● सुनिल तटकरे दखल घेतील का..?

● चौकशीसह संबंधितांवर कारवाईची मागणी.

● समाजसेवक सुहास महागावकर यांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनपत्र

● तालुक्यात निकृष्ट दर्जाचे कामांचे उदाहरण म्हणजे ग्रा.पं.घुम-रुद्रवट

 म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   शासनाच्या वेगवेगळ्या योजना व विकास निधींमधून मंजूर करण्यात आलेल्या करोडो रुपयांच्या विकासकामांमधे भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाची कामे केलेली असल्याने बहुचर्चित असलेली म्हसळा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत घुम-रुद्रवट मधील मौजे घुम गावातील प्रसिध्द असे तीर्थक्षेत्र स्वयंभू शंकराचे घुमेश्वर मंदिर येथे भाविक-भक्तांच्या निवासाची सोय व्हावी व अधिक प्रमाणात भक्तगण या मंदिरात दर्शन घेण्यासाठी यावेत या हेतूने 10 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या भक्तनिवास इमारत व स्वच्छतागृह बांधणे या कामाच्या संदर्भात माहिती मागवून कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी घुमेश्वर ग्रामविकास सेवा मंडळ मुंबई अध्यक्ष तथा समाजसेवक श्री.सुहास महागावकर यांनी म्हसळा पंचायत समिती गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, उपअभियंता सा.बां.विभाग म्हसळा-श्रीवर्धन व ग्रामसेवक यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.
   याबाबत सविस्तर वृत्त असे मागील काही महिन्यांपासून ग्रामपंचायत घुम-रुद्रवट हद्दीत झालेल्या विकासकामांची चौकशी सुरू असून यामध्ये 13 वा वित्त आयोग निधी, एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्प, पंचायत समिती सेस फंड, जिल्हा परिषद फंड, जिल्हा वार्षिक नियोजन फंड अशा वेगवेगळ्या प्राप्त निधींमधून करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाचे व बोगस विकासकामांची चौकशी पंचायत समिती स्तरावरून सुरु असतानाच आता पुन्हा एकदा घुम गावात प्राचीन काळापासून असलेले स्वयंभू शंकराचे मंदिर या ठिकाणी 2011-12 या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नाने 10 लाख रुपये मंजूर करून भक्तनिवास इमारत बांधण्यात आलेली आहे. या इमारतीच्या बांधकामाचा दर्जा अतिशय सुमार व निकृष्ट असल्याने चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या सुनिल तटकरे यांनी या धार्मिक कामासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर करून दिला त्यांच्या नावाची साधी पाटी देखील या इमारतीला लावली नाही किंवा कुठेही तटकरे यांचा साधा नामोल्लेख सुध्दा केलेला दिसून येत नाही त्याचबरोबर कामाचे तपशील तसेच योजनेबाबत सविस्तर नामफलक लावलेले नाही तसेच इमारत बांधून पाच-सहा वर्षे पूर्ण व्हायला आली तरीही खुद्द माजी मंत्री सुनिल तटकरे यांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला या भक्तनिवास इमारतीचे उदघाटन करायला बोलावले नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असून अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
      सध्याच्या अवस्थेत या इमारतीच्या बांधकामाला पूर्णतः तडा गेलेल्या आहेत, स्वच्छता गृहातील पाईप किंवा हात धुण्यासाठी बसविण्यात आलेल्या भांड्याना पाईप फिटिंग नाही, काही ठिकाणीजुनेच सडलेले पाईप वापरले आहेत, फाउंडेशन लादी व पायऱ्या पूर्णतः उखडल्या आहेत त्यामुळे या कामाचा सुमार दर्जा उघडपणे दिसून येत असून भक्तनिवास इमारत बांधकामाची पूर्णतः दुरावस्था झाली आहे.
     भक्तनिवास इमारत बांधकामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांना योग्य ती माहिती नसल्याने इमारत बांधकामासाठी वापरण्यात आलेले मटेरियल, अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी पत्र, घुम-रुद्रवट ग्रामपंचायतकडून देण्यात आलेले सर्व ठराव, इंजिनिअरने काम पूर्ण झाल्याचा दिलेला दाखला, ठेकेदाराचे नाव, योजनेचे नाव, कामासाठी मंजूर निधी व प्रत्यक्ष खर्च झालेला निधीचा तपशील अशा स्वरूपाची सविस्तर माहिती गटविकास अधिकारी व संबंधित विभागाकडून मागविण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संबंधित कामासाठी वापरण्यात आलेले पाईप हे जुनेच वापरले असल्याचे प्रत्यक्षदर्शी कामाच्या पाहाणीवरून दिसून येत असल्याचे सुहास महागावकर यांनी सांगितले.


 माजी मंत्री सुनिल तटकरेंच्या नावाची पाटी नाही, उदघाटन नाही...!
     श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून गाव वाडीवस्तीवर अनेक लोकोपयोगी विकासकामे करण्यात आलेली आहेत त्यामुळे साहजिकच माजी मंत्री सुनिल तटकरे किंवा आमदार अनिकेत तटकरे, जिप अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन किंवा उदघाटन ज्या - त्या गावातील गाव पुढारी किंवा ग्रामस्थ करून घेत असतात. त्याचबरोबर एक लाख किंवा त्याहीपेक्षा जास्त मंजूर रकमेच्या विकासकामांचे उदघाटन करण्यासाठी गाव पुढारी खुद्द सुनिल तटकरेंना किंवा कुटुंबियांना बोलावतात मग घुम गावात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वयंभू घुमेश्वर मंदिराच्या परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 10 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भक्तनिवास इमारतीचे उदघाटन करायला माजी मंत्री सुनिल तटकरे यांना का बोलावले नाही ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे जर का निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळेच व कामाची पाटी न लावल्यामुळे तटकरे यांना उदघाटन करण्यासाठी बोलाविले नसेल अशीही चर्चा रंगत आहे. त्यामुळे घुम-रुद्रवट ग्रामपंचायत मधे शासनाकडून मंजूर करून आणलेल्या निधीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मर्जीतील ठेकेदार जर का स्वतःला कामाची टक्केवारी मिळवून घेण्यासाठी सुनिल तटकरे यांच्या नावाचा वापर करून अधिकारी वर्गावर दबाव टाकून अधिकाऱ्यांना व इंजिनियरला हाताशी धरून आणि मर्जीतील ठेकेदारांना कामाची ठेकेदारी देऊन त्या ठेकेदारांशी संगनमताने निधीचा गैरवापर करून निकृष्ट दर्जाची कामे करीत असतील तर अशा पक्ष पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालून सुनिल तटकरे अजूनही त्यांचे लाड पुरवतील का ? हा प्रश्न तालुक्यातील जनता विचारीत असून अशा पद्धतीने टक्केवारीच्या नादात गुंतलेल्या पक्ष पदाधिकारी यांची कानउघडणी करतील का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


 16 लाख खर्चाचे पुलाचे काय झाले ..?
       घुम गावातील भक्तनिवास इमारतीचे बांधकाम जसे निकृष्ट केले आहे आणि त्या इमारतीचे अजूनही उदघाटन केलेले नाही त्याच प्रमाणे सन 2014 मधे रुद्रवट गावात देखील नागरिकांच्या दैनंदिन सोयीसाठी नदीवर 16 लक्ष रुपये खर्चाचे पूल बांधणे हे काम देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री सुनिल तटकरे यांनी मंजूर केलेले आहे या कामाचे देखील काय झाले याबाबत नागरिक संभ्रमावस्थेत आहेत तसेच जर हे काम योग्य दर्जाचे व सुस्थितीत पूर्ण केलेले असेल तर मग रुद्रवट गावात देखील सुनिल तटकरे यांना या पुलाचे उदघाटन करण्यासाठी का बोलावले नाही हा सुद्धा प्रश्न गुलदस्त्यात असून पुलाचे बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या 16 लक्ष रुपयांचे काय झाले ही चर्चा सुरू आहे. यामुळे ग्रामपंचायत घुम-रुद्रवट हद्दीत माजी मंत्री सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नातून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व वेगवेगळ्या योजनांचे माध्यमातून करोडो रुपयांची विकासकामे केलेली आहेत असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे पक्षाचे स्थानिक नेते कामांच्या दर्जाबाबत येथील भोळ्याभाबड्या जनतेला माहिती देतील का असा रोखठोक सवाल नागरिक करीत आहेत.


 घुम येथील भक्तनिवास इमारत बांधकाम संबंधित मूळ फाईल्स आमच्या कार्यालयात उपलब्ध नाहीत त्या फाईल मागील इंजिनिअर पी.जे.अत्तार यांनी अलिबाग येथील कार्यालयात जमा केलेल्या असाव्यात. त्या फाईल्स मिळाल्यावर अर्जदार श्री.महागावकर यांना सविस्तर माहिती देण्यात येईल व कामाची चौकशी केली जाईल.
-श्री.राजेंद्र काकुलसे , उपअभियंता जिप.सा.बां.विभाग  म्हसळा-श्रीवर्धन

घुम येथे बांधण्यात आलेली भक्तनिवास इमारत म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचे व फक्त टक्केवारी मिळवण्याचा उद्देशाने केलेले भ्रष्टाचारी काम आहे. तसेच हे भक्तनिवास आहे की गुरांचा गोठा आहे हेच कळत नाही त्यामुळे संबंधित कामासाठी काय मटेरियल वापरले, कामाचा दर्जा किंवा अनेक प्रश्न याबाबतीत आहेत म्हणून कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या इमारतीचे उदघाटन का केले नाही आणि माजी मंत्री सुनिल तटकरे साहेब यांच्या नावाची पाटी का लावली नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
-श्री.सुहास महागावकर, अध्यक्ष - घुमेश्वर ग्रामविकास सेवा मंडळ मुंबई



घुम येथे बांधण्यात आलेली भक्तनिवास इमारत ही इस्टीमेंट प्रमाणे बांधण्यात आलेली आहे किंवा कशी याबाबत सविस्तर चौकशी केल्यावर समजेल. तसेच या इमारतीचे आजपर्यंत उदघाटन झालेले नाही त्याचबरोबर या इमारतीला कोणतेही सविस्तर नामफलक देखील लावण्यात आलेले नाही ही वस्तुस्थिती खरी आहे. चौकशी झाल्यावर अधिक सत्य बाहेर येईल.
-श्री.गुरुनाथ विरकुड, ग्रामसेवक - ग्रा.पं.घुम-रुद्रवट

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा