साभार :-उमाजी म. केळुसकर
६९ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी चारशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या मुरुडच्या जंजिरा किल्ल्यावर तिरंगा तिरंगा फडकला. जंजिरा संस्थानात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. हा दिवस तसा एका डोळ्यात हसू आणि दुसर्या डोळ्यात आसू अशाप्रकारचा होता, कारण त्याच्या आदल्या दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. पण दुसर्या दिवशी म्हणजे ३१ जानेवारी या दिवशी जंजिरा संस्थानाच्या पारतंत्र्यातून कुलाबा जिल्ह्यातील मुरुड, म्हसळा आणि श्रीवर्धन या तीन तालुक्यांनी स्वातंत्र्याचा श्वास सोडला. कारण देश ब्रिटीशांच्या जोखडातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी मोकळा झाला असला तरी ब्रिटिशांचे मांडलिक असलेल्या सिद्दी नबाबाच्या जंजिरा संस्थानाच्या पारतंत्र्यातून मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन हे तीन तालुके मुक्त झाले नव्हते, ते देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल साडे पाच महिन्यांनी महाडच्या क्रांतीवीर नानासाहेब पुरोहितांनी घडविलेल्या जनआंदोलनाने ३१ जानेवारी १९४८ ला मुक्त झाले आणि येथील स्वातंत्र्यप्रिय जनतेसाठी आनंदाची पहाट उगवली. जंजिरा अजिंक्य असल्याचा तोरा या रक्तहीन क्रांतीने धुळीस मिळाला.
रायगड जिल्ह्याच्या मातीत स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर जे जे लढे झाले, ते इतिहासाच्या पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगे आहेत, पण दुर्दैवाने हे काम नेटकेपणाने झाले नाही आणि सत्तेच्या संगीत खुर्चीत रममाण झालेल्या महाराष्ट्रातील विविध राज्यसरकारांना या लढ्यांचे गांभीर्य लक्षात घ्यावेसे वाटले नाही. तसे नसते तर सरकारने जंजिरा संस्थानच्या १९४८ च्या स्वयंस्फूर्त स्वातंत्र्यलढ्याची नोंद घेतली असती आणि या लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केला असता. संपूर्ण देशात जनतेने उठाव करुन विलिनीकरण झालेले जंजिरा-मुरुड हे एकमेव संस्थान आहे. या संस्थानचा नबाब मुस्लीम तर प्रजा प्रामुख्याने हिंदू अशी होती. असे असले तरी हा लढा मुस्लीमांच्या विरुद्ध हिंदू असा नसून भारतात विलिन होण्यास इच्छुक नसलेले जंजिर्याचे सिद्दी नबाब विरुद्ध स्वातंत्र्यप्रिय अठरापगड जातींचा होता, मग त्यात हिंदूही होते आणि मुस्लीमही होते. मुळात हिंदूबहुल विभागात नबाबाचे संस्थान कसे, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. तो काळ असा होता की ज्याच्या मनगटात ताकद आणि मेंदुत युक्ती आहे तो कुठेही राज्य करु शकत होता. सद्य जंजिर्याच्या जागी त्याकाळी लुटारु आणि चाचे लोकांच्या उपद्रवापासून बचाव व्हावा म्हणून कोळ्यांनी राम पाटलांच्या नेतृत्वाखाली उभारलेला मेढेकोट निजामशहाने पाठवलेल्या पिरमखान या हबशी सरदाराने १४९० साली ताकद आणि युक्तीच्या जोरावर जिंकला होता. त्यानंतर या परिसरात त्यांनी आणि त्याच्यानंतरच्या शासकांनी आपली पाशवी दहशत निर्माण केली. पुढे पिरमखानच्या मृत्यूनंतर त्याच्याजागी बुर्हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे त्याने १५६७ ते १५७१ या चार वर्षांत निजामाच्या परवानगीने भक्कम किल्ला बांधला. पुढे १६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. तो या संस्थानचा पहिला नबाब ठरला. त्यानंतर एकूण यानंतर १९४८ पर्यंत २० सिद्दी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर हक्क गाजवला.
छत्रपती शिवाजी महाराजानी चार वेळा प्रयत्न करुनही थोडक्यात जंजिरा हातातून निसटला, त्यांना जर या मोहिमेसाठी पुरेसे आयुष्य आणि पुरेसा वेळ मिळाला असता तर त्यांच्यासाठी जंजिरा जिंकणे अशक्य नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. छत्रपती संभाजी महाराजाच्या हातात जंजिरा येत आहे हे पाहून औरंगजेबाने हसनअली या सरदारला चाळीस हजाराची फौज घेऊन कल्याण भिंवडीच्या मार्गे रायगडाच्या दिशेने पाठवले. त्यामुळे नाईलाजास्तव महाराजांना रायगडावर फिरावे लागले. त्यामुळेही संभाजी महाराजांच्याही हाती हा किल्ला लागला नाही. मराठ्याच्या हाती जाऊ नये म्हणून मोगल, इंग्रज व पोर्तुगिजांना एकत्र आणणारा हा जंजिरा असला तरी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सिद्दीच्या कारवायांवर अंकुश ठेवून परिसरातील त्याच्या दहशतीपासून जनतेला अभय दिले.
पेशवाईच्या अस्तानंतर १८१८ साली इंग्रजांनी जंजिर्यावर वर्चस्व प्रस्थापित करुन १८३४ मध्ये नबाब सिद्दी मुहम्मद खान (दुसरा) यास मांडलिक केले. तेथील टांकसाळ बंद केली. सिद्दी मुहम्मद खान याने १८४८ मध्ये राज्यत्याग करुन सिद्दी इब्राहिम खान या मुलास गादीवर बसविले. १८६७ मध्ये जंजिर्याचा नबाब व तेथील सरदार यांत तीव्र मतभेद निर्माण झाले. तेव्हा इंग्रजांनी नबाबाला पदच्युत करुन १८६९ साली तिथे इंग्रज रेसिडेंट नेला. पुढे नबाबाने इंग्रजांशी करारनामा केला. तेव्हा त्याचे पद चालू ठेवले, पण अधिकार कमी केले. सिद्दी इब्राहिम खान १८७९ मध्ये मरण पावला. त्याच्या तीन मुलांपैकी (पहिले दोन अनौरस व धाकटा औरस) धाकट्या अल्पवयीन सिद्दी अहमद खान या पुत्रास इंग्रजांनी गादीवर बसविले. ते राजकोट-पुण्याला शिक्षण घेऊन सज्ञान झाल्यावर त्यांच्याकडे इंग्रजांनी राज्यकारभार दिला. त्यांनी संस्थानात शाळा काढली. मुरुडचे जंगल तोडून रस्ते केले. १८९२ मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व्हिक्टोरिया ज्युबिली वॉटर वर्क्स ही योजना राबविली. शिवाय नगरपालिका आणि लोकल बोर्डाची स्थापना करुन पायाभूत सुविधा निर्माण केल्या. या त्यांच्या कार्याविषयी ब्रिटिशांनी त्यांस के. सी. आय. ई. हे बिरुद बहाल केले. त्यांस ७०० लोकांचे संरक्षक दल ठेवण्याची मुभा होती. त्यांच्यानंतर त्याचे पुत्र सिद्दी मुहम्मद खान नबाब बनले. ब्रिटिशांचे मांडलिक असलेल्या नबाबांपैकी शेवटच्या दोन नबाबांनी आपल्या संस्थानात जनहिताची अनेक कामे केली. आपला चांगला ठसा उमटवला आणि आपल्या पूर्वजांच्या चुका सुधारल्या.
अशाप्रकारे १६१७ ते १९४८ अशी ३३१ वर्षे जंजिरा सिद्दीच्याच ताब्यात राहिला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी हिंदुस्थान ब्रिटिशांचा दास्यत्वातून मुक्त झाला, पण त्यांनी या स्वातंत्र्याच्या आनंदात पाचर मारुन भारत आणि पाकिस्तान अशी या देशाची फाळणी केली व संस्थानिकांना या दोनपैकी कोणत्या देशात विलिन व्हायचे हे ठरविण्याचा पर्याय दिला. काश्मीरच्या हिंदू राजाने पर्यायाची निवड करण्यास उशीर केला व त्यातून पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात गेला. हैद्राबादच्या निजामाने विलिनीकरणास नकार दिल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सैन्य पाठवून हैद्राबाद मुक्त केले. जुनागडच्या नबाबाने पाकिस्तानात विलिन होण्याचा पर्याय जाहीर केला व जनतेने नकार दिला आणि जुनागड भारतातच राहिला. जंजिरा संस्थानच्या नबाबाला पाकिस्तानात विलिन व्हायचे होते, परंतु भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबरोबरच संस्थानापासून स्वातंत्र्य मिळावे ही मागणी जंजिरा संस्थानात सुरु असल्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला तरी मुरुडचा नबाब संस्थानचे विलिनिकरण भारतात करत नाही, हे पाहून पुन्हा स्वातंत्र्य लढ्याला उठाव मिळाला.
क्रांतीवीर नाना पुरोहित यांनी प्रजा परिषद या संघटनेद्वारे समाजातील सर्व घटकांना जवळ करुन सैन्य उभे केले आणि राजाभाऊ चांदोरकर, हरिभाऊ भडसावळे, मोहन धारिया, सदाशिव बागाईतकर, भिवा पवार, गुणाजी लोखंडे, पुतळाजी पाष्टे, रामभाऊ साठे, विठोबा जाधव, नामदेव दळवी, अच्युत भट, बापुसाहेब राजे, बापूसाहेब दातार, केशवराव खांबेटे, बापूसाहेब करडे, राम चिटणीस, केशवराव कदम आदी हजारो सहकार्यांसह जंजिरा मुक्तीचा लढा सुरु केला. त्यांनी १९४८ च्या २८ जानेवारी रोजी म्हसळा आणि ३० जानेवारी रोजी श्रीवर्धन ताब्यात घेतले. दुर्दैवाने याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या झाली होती, तरी दु:खाला आवर घालून स्वातंत्र्यसैनिकांनी ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर रातोरात भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, मुंबईचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि मुरुडचे नबाब सिद्दी मुहमद खान यांना श्रीवर्धन पोस्टातून ‘म्हसळा, श्रीवर्धन मुक्त. उद्या मोर्चा मुरुडवर’ असा मजकूर असलेल्या तारा रवाना झाल्या. या तारेने नबाबाचे धाबे दणाणले. ताबडतोब त्यांनी ३१ जानेवारी रोजी मुंबईकडे धाव घेतली आणि आपण सामीलनाम्यावर सही करायला तयार असून, मुरुडवरचा हल्ला थांबविण्याची त्यांनी मुख्यमंत्री खेरांना विनंती केली. खेरांना नानासाहेब पुरोहितांची तार मिळाली होतीच. त्यांनी सामीलनाम्याचे कागद तयार केले आणि नबाबांपुढे ठेवले. भेदरलेल्या नबाबांनी त्यावर लगेच स्वाक्षरी केली. ताबडतोब खेरांनी ही बातमी नानासाहेब पुरोहितांना कळवली. त्यांनी जंजिरा किल्ल्यावर तिरंगा फडकविला आणि जंजिरा संस्थान बरखास्त केल्याचे जाहीर केले. त्यानंतर तेथे निर्नायकी होऊ नये म्हणून हंगामी सरकार स्थापन केले गेले आणि पुढील ४ दिवस संस्थानचे पंतप्रधान म्हणून नानासाहेब पुरोहितांनी भूमिका बजावली. ५ फेब्रुवारी १९४८ रोजी संस्थानची सर्व सूत्रं तत्कालिन जिल्हाधिकारी झुबेर यांच्याकडे त्यांनी सोपवली आणि अधिकृतपणे जंजिरा संस्थान रक्ताचा एकही थेंब न सांडता स्वतंत्र भारतात विलिन करण्यात झाले. अजिंक्य समजल्या जाणार्या जंजिर्याची घमेंड जनतेच्या स्वातंत्र्याच्या ध्यासाने मोडली. तेथे लोकशाहीचे पर्व सुरु झाले. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच लोकशाहीत या लढ्याची उपेक्षा झाली.
हैद्राबादचा मुक्ती लढा सैनिकी कारवाईमुळे यशस्वी झाला, पण मराठवाड्यात त्या लढ्याचे स्मरण दरवर्षी शासकीय पातळीवर केले जाते, पण रायगडात जनआंदोलनातून एक संस्थान भारतात विलिन झाले त्या लढ्याची व तो लढणार्या देशभक्तांची सरकार दखल घेत नाही, हा करंटेपणा कुठपर्यंत चालणार? सरकारने आतातरी जागे व्हावे आणि या आगळ्या मुक्ती लढ्याचे शासकीय पातळीवरुन दरवर्षी स्मरण केले जावे, हीच अपेक्षा.

माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.....
ReplyDeletePost a Comment