म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत नेवरूळ येथे काही वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत माजी उपसभापती रविंद्र लाड यांनी दि.26 जानेवारी 2019 रोजी ग्रामपंचायत सदस्य व अन्य सहकाऱ्यांसह तहसिल कार्यालयात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा संबंधित प्रशासनाला दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे नेवरूळ गावात भारत निर्माण नळपाणी योजनेअंतर्गत न.पा.पु.योजना समीती 26 जानेवारी 2012 रोजीच्या ग्रामसभेमध्ये समीती गठीत करण्यात आली या समितीवर अध्यक्ष पांडुरंग लाड व सचिवपदी राजेंद्र लटके यांची नियुक्ती करण्यात आली होती. 02 मे 2005 च्या शासकीय मार्गदर्शक तत्वानुसार नेवरूळ न.पा.पू.योजने कामी समीतीने रा.जि.प.पाणीपुरवठा विभाग यांच्याबरोबर केलेल्या करारानुसार शासन निर्णयातील काही अटी शर्थींना अधीन राहुन प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. सदर योजनेच्या कामाची सुरूवात दि.01 एप्रिल 2009 रोजी पाणीपुरवठा समीती व ग्रामस्थांच्या देखरेखीखाली करण्यात आली होती आणि हे काम पूर्ण होऊन दि.27 मार्च 2012 रोजी योजना ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आली. तेव्हापासून पाणी करापोटी व अनामत रक्कम पोटी जी वर्गणी गोळा केली त्या वर्गणीची हिशोब समीतीने ग्रामस्थांना दिलेला नाही. वारंवार पत्रव्यवहार व ग्रामसभेमध्ये मासीक सभेमध्ये हिशोब मागणी केली असता ग्रामसेवक व ग्रामस्थांना चुकीचीच माहीती नविन पाणी पुरवठा समीती अध्यक्ष तुकाराम दिवेकर व सचिव रामदास रिकामे यांच्याकडुन दिली जात असल्याचे बोलले जात असून एखादया ग्रामस्थानी व ग्रामसेवक यांनी या विषयावर चर्चा घडवुन आणली तर त्याला योग्य प्रकारे माहिती दिली जात नाही असे रविंद्र लाड यांचे म्हणणे असून सामान्य नागरिक पाणीकर भरून शासनास सहकार्य करण्यास तयार आहेत परंतु दरसाल पाणी करापोटीची रक्कम न काढल्याने ग्रामस्थ एकदम वर्गणी कशी काय भरणार या चिंतेत आहेत. ग्रामस्थांना कराच्या पावत्या अनामत रकमेच्या पावत्या दिल्या जात नाहीत.
नविन शासन निर्णयानुसार पाणिपुरवठा समितीचा कारभार विद्यमान ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व सचिव ग्रामसेवक यांनी पहायचा आहे असे लेखी आदेश असताना चार वेळा ग्रामसभेत या विषयावर चर्चा झाली असून गटविकास अधिकारी, पाणीपूरवठा समिती यांना नोटीस देऊन अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. केवळ हिशोब देण्यास लागेल म्हणुन मुबंई कमीटी व स्थानिक कमीटी एकमेकांकडे बोट दाखुन वर्ष वाया घालवीत आहेत. या सर्व गोष्टीला कंटाळुन जेष्ठ नागरीक अध्यक्ष पांडूरंग लाड यांनी स्वेच्छेने राजीनामा दीला आहे वारंवार मागणी करून देखील जर हीशोबच देत नसतील तर नक्कीच यामध्ये काही तरी गैरव्यवहार असल्याचा संशय येतो म्हणूनच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांसह येत्या 26 जानेवारी रोजी तहसिल कार्यालय येथे आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती माजी उपसभापती रविंद्र लाड यांनी दिली आहे.
-------------------
ग्रामस्थांना पडलेले प्रश्न :-
अनामत रक्कम व पाणीकराच्या पावत्या अद्याप का देत नाहित ? भारत निर्माण योजनेला सात वर्ष झाली असताना ती सुस्थितीत असताना नवीन योजना फक्त पाईपलाईन का टाकली ? पैशाचा हिशोबाचे काय ? योजनेची 15 वर्षाची शाश्वती असताना त्याच योजनेवरून दोनच वर्षात दुसरी योजना का व कशासाठी राबवीली ? त्यानंतर पाईपलाईनचे काय ते पाईप असेच सडत आहेत त्याला जबाबदार कोण ? बंधारा, न.पा.पू.योजना भारत निर्माण व आरोग्यपाणी योजना यांचे खात्यात असलेली अनामत रक्कम कुठे खर्च केली त्याचा पूर्ण तपशील कोण देणार की नाय ?
असे अनेक प्रश्न ग्रामस्थांना पडले आहेत असेही रविंद्र लाड यांनी सांगितले आहे.
नेवरूळ नळपाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात काही लोकांकडून होत असलेले आरोप राजकीय सुडापोटी होत आहेत तसेच या योजनेची सविस्तर माहिती आमच्या कमिटीने ग्रामस्थांना व ग्रामपंचायत मधे अनेक वेळा ग्रामसभेत दिलेली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार केलेले नाही. जे आमच्यावर आरोप करीत आहेत त्यांनी मिटींगमधे बसून हिशोब घ्यावा फक्त आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये. तसेच ज्यांना आमरण उपोषण करायचे आहे त्यांनी नक्कीच उपोषण करावे. ग्रामसभेत आम्ही योजनेच्या बाबतीत जमा खर्च वाचन करून दाखविले आहे व ते ग्रामस्थांनी मान्य केलेले आहे.
-श्री.रामदास रिकामे, ग्रा.पं.माजी सरपंच तथा सचिव पाणी कमिटी नेवरूळ
नेवरूळ ग्रामपंचायत मधील नळपाणी पुरवठा योजनेसंदर्भात जमा खर्च कमिटीने वाचन करून दाखविले आहे परंतु ते कच्चा स्वरूपात आहे. व्हाउचर किंवा अन्य कागदोपत्री जमा-खर्च सादर केलेला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. तसेच ही योजना ऑन रेकॉर्ड हस्तांतरित झालेली आहे परंतु कागदोपत्री हिशोब मिळत नसल्याने सध्या जुनीच पाणी कमिटी व्यवहार सांभाळीत आहेत.
-श्री.एस.एल.म्हेत्रे, ग्रामसेवक नेवरूळ ग्रामपंचायत

Post a Comment