माणगाव - दिघी मार्गाला गती ; रुंदीकरणाने औद्योगिक दिघी पोर्ट व दिवेआगर पर्यटन वाढीला चालना मिळणार.


दिघी : गणेश प्रभाळे 
दिल्ली मुंबई कॉरिडॉर प्रकल्पात समावेश असलेल्या दिघी पोर्ट ला जोडणारा माणगाव - दिघी या मार्गाचे काम वेगाने सुरू होत आहे. ठिकठिकाणी खड्डे व रुंदीकरणाच्या कामामुळे त्रास होत असला तरी नवीन रस्ता होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. 
गेली कित्येक वर्षे माणगाव ते दिघी दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत होते. त्याचा त्रास वाहतुकीला  होत आहे. माणगाव ते दिघी दरम्यानच्या रस्त्याचे काम माणगाव पासून मोर्बे, डोंगरोली, साई, घोणसे घाट, म्हसळा, सकलप, मेंदडी अशा ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने रस्त्यावर वाहतुकीला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चालक सांगतात. माणगाव ते दिघी पर्यंत च्या रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने करावे लागत असल्याचे एमएसआरडीसी चे अधिकारी सांगतात. माणगाव पासून म्हसळा बायपास ते दिघी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य दिसते. 


पर्यटक गोरेगाव मार्गे - 
माणगाव ते म्हसळा मार्गाच्या दरम्यान ठिकठिकाणी रुंदीकरणास सुरुवात झाली आहे. काम सुरू असल्याने रस्ते देखील आखूड बनले आहेत शिवाय धुळीचा त्रास देखील मोठया प्रमाणावर आहे. त्यामुळे पुणे व इतर ठिकाणाहून दिवेआगर, श्रीवर्धन व मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी माणगाव वरून साई मार्गे जाण्या ऐवजी लोणेरे गोरेगाव - म्हसळा असा मार्ग वापरला जातो.


तरुणांना मिळणार रोजगार - 
पुणे- दिघी महामार्ग क्रमांक 753F :  पुणे -मुळशी - माणगाव - दिघी हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग बनला आहे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (msrdc) च्या माध्यमातून सद्या रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. श्रीवर्धन परिसराला मोठे महत्त्व आहे. त्यामध्ये आता या महामार्गामुळे परिसरातील अनेक बाबींना चालना मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना व्यावसायिक आणि रोजगारांच्या अनेक संधी मिळतील.


दिवेआगर येथील आल्हाददायक निसर्गाच्या भेटीने कुटुंब सुखावले. मात्र, रस्त्याचे कामामुळे प्रवास त्रासदायक ठरले असले तरी पुढे रस्त्याचं काम लवकरच पूर्ण झाल्यास परत - परत श्रीवर्धनकडे भटकंती करण्याचं उत्साह वाढणार आहे.
- विवेक नकाते, पुणे - काळेवाडी, पर्यटक.


दिघी - माणगाव मार्ग बनत असल्याने तालुक्यातील खड्डेमय खिळखिळ्या प्रवासातून सुटका होणार असून वाहनांमधील बिघाड होण्याची समस्या दूर होईल.
- प्रवीण वडके, रिक्षा चालक, बोर्लीपंचतन.

माणगाव ते दिघी दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे त्याचं परिणाम यावेळी पर्यटनावर जाणवलं. सद्या रस्त्याच्या कामाला गती मिळत आहे. या रुंदीकरणाने औद्योगिक क्षेत्र दिघी पोर्ट व दिवेआगर पर्यटनात वाढ होऊन रोजगाराला चालना मिळण्याची आशा आहे.
- भावेश जैन, स्थानिक व्यवसायिक.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा