म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
देशातील आणि राज्यातील भाजप युतीचे सरकार पाडण्यासाठी सर्वच समविचारी धर्मनिरपेक्ष विचाराचे पक्ष आज एकत्रितपणे येवुन आघाडी करीत आहेत . दोन वर्षांपूर्वीच रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे सुनिल तटकरे आणि शेकापचे नेते जयंत पाटील हे एकत्र आले आणि जातीयवादी पक्षाला रायगड मध्ये बाजुला ठेवण्याचे काम आम्ही केले . तेच काम आता राज्यात आणि देशात घडत असल्याचे चित्र पहायला मिळत असल्याचे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ४३ लक्ष मंजुर निधीच्या नपापु योजनेचे भूमिपूजन कार्यक्रमाला संबोधित करताना तटकरे बोलत होते . कार्यक्रमाला आमदार पंडित पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील , जिल्हा कृषी सभापती प्रमोद पाटील , जेष्ठ नेते महमदभाई मेमन , बालशेट करडे , भाये , तालुका अध्यक्ष समीर बनकर , श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रसाद विचारे माजी सभापती नाझीम हसवारे , शेकाप चिटणीस संतोष पाटील , सभापती छाया म्हात्रे , उपसभापती संदीप चाचले , जिल्हा परिषदेच्या सदस्या धनश्री पाटील सरपंच स्वप्नील बिराडी , अक्रम साठविलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते . सुनिल तटकरे यांनी भाजप शिवसेनेच्या सरकारने सर्वच बाबतीत जनतेला फसविले आहे साडेचार वर्षांपुर्वी जे आश्वाशीत केले गेले ते या सरकारने काही केलेच नाही , अच्छे दिन आलेच नाहीत , महागाई वाढली आहे , शेतीच्या मालाला भाव नाही , तरुणांना नोकऱ्या नाहीत , उद्योग व्यवसाय ठप्प आहेत , देशात संविधान धोक्यात आले आहे . फक्त घोषणाबाजी चालु आहे , जातीयवाद निर्माण करून मते घ्यायची आणि सत्तेवर यायचे हेच धोरण भाजप आघाडी सरकारने अवलंबविले असल्याने त्याचा येत्या लोकसभा निवडणुकीत पाडाव करण्यासाठी गोंडघर पासुन शेकाप , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरूवात केली असल्याचे तटकरे यांनी सांगितले . सहावेळा निवडून गेलेले रायगडचे खासदार अनंत गीते हे सर्वात जास्त विकास निधी खर्च केला आहे असे सांगत आहेत . खासदार , आमदार निधी खर्च केला म्हणजे विकास केला असे होत नाही शासनाचा खासदार आमदार निधी सर्वच जण खर्च करतात , परंतु मंत्री म्हणून वैयक्तिक राजकीय कौशल्य , ताकद आणि पदाचा वापर करीत गीते यांनी रायगडचा विकास ज्या पद्धतीने करायला पाहिजे तसा केला नाही याची खंत व्यक्त करताना मंत्री पदाचे जोरावर जो विकास करायला पाहिजे होता तो करता आला नाही . केंद्रात अवजड खात्याचे मंत्री असुनही त्यांना जिल्ह्यात एक उद्योग आणता आलेला नाही असे गीते स्वतः वार्तालाप करताना कबुल करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामुळे उद्योग आणता आले नाही ही नामुष्की तर आहेच परंतु खासदार गीते यांचे पुरते अपयश असल्याची टिका केली . गोंडघर भागात येणारा औद्योगिक प्रकल्प हा प्रदूषण विरहित असेल येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हिताचाही असेल प्रकल्पाला जर का ग्रामस्थांचा विरोध असेल तर तुमच्या सोबत सुनिल तटकरे आणि आमदार जयंत पाटील तुमच्या सोबत असतील असे आश्वासन दिले . आमदार पंडित पाटील यांनी ही निवडणूक तटकरे यांना अत्यंत सोपी असुन यावेळी आम्ही एकत्रित आहोत आमचे तात्त्विक वाद होते , राजकारणात ते असतात पण आता आम्ही एकदिलाने काम करीत आहोत असे सांगितले . अगोदर जे झाले ते आता कधी होणार नाही येथे शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्यांना योग्य न्याय मिळेल असे सांगितले . रायगड लोकसभेचे आपले उमेदवार सुनिल तटकरे हे गावागावात जाऊन काम करणारे नेतृत्व असल्याचेही त्यांनी सांगितले . कार्यक्रमासाठी पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment