दिघी : गणेश प्रभाळे
लोकशाहीत मतदाराला दिलेला मतदानाच्या अधिकार हा सर्वोच्च आहे. निवडणूकीच्या वेळी आपले मतदान योग्य उमेदवाराला होऊन आपल्या मतदान हक्काची अंमलबजावणी होण्यासाठी आपण जागरुक असलं पाहिजे,असे आग्रही प्रतिपादन प्रांताधिकारी यांनी आज येथे केले.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आज 9 वा राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘वंचित न राहो कुणीही मतदार’ हे यावेळच्या मतदार दिनाचे घोषवाक्य होते. या निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात नव मतदार, व महिला मतदारांचा मोठा सहभाग दिसून आला. या कार्यक्रमानिमित्त आज सकाळी र ना राऊत हायस्कुल ते शिवाजी चौक गन्द्रे नाका असे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मतदार जनजागृती संदर्भात घोषणा देऊन श्रीवर्धन शहरातील मतदारांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली. प्रत्येक मतदाराने निवडणूकांची माहिती करुन घेतली पाहिजे. चांगला अभ्यासू प्रतिनिधी निवडण्यासाठी आपणही जागरुकपणे व कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची जबाबदारी पार पाडली पाहीजे, तेच आपले राष्ट्रीय कर्तव्य होय. चांगला लोकप्रतिनिधी निवडून दिला तरच आपल्याला चांगल्या सुविधा, सेवा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आपल्या देशाचा विकास होत असतो. त्यासाठी प्रत्येकाने आवर्जून निवडणूकीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जे जे नवमतदार आहेत त्यांनी, तसेच दिव्यांग मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन प्रवीण पवार यांनी यावेळी केले.त्यानंतर पथनाट्य व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मतदार जनजागृती व मतदान नोंदणीचे उत्कृष्ट कार्य करणारे स्पर्धक, विद्यार्थी व निवडणूक कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.सदरच्या कार्यक्रमा साठी तहसीलदार जयराज सुर्यवंशी नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने ,नायब तहसीलदार रामभाऊ गिरी ,म्हसळा तहसीलदार रामदास झळके प्राध्यापक अनिल वाणी व पंचायत समिती सदस्य मंगेश कोबनाक आदी उपस्थित होते .
विविध स्पर्धेतील विजेत्यांची नावे याप्रमाणे-
रांगोळी स्पर्धा - रविना रटाटे ,दुर्वा कडू ,
निबंध स्पर्धा -श्रेया हेदूलकर ,प्रतीक्षा चोगले ,
चित्रकला स्पर्धा - जिग्नेश येसवरे ,गुलनाज फकीर


Post a Comment