ग्रा.पं.घुम-रुद्रवट येथे प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्यास सरपंचच अनुपस्थित....
● अखेर उपसरपंचांवर ध्वजारोहण करण्याची आली वेळ
म्हसळा : वार्ताहर
म्हसळा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत घुम-रुद्रवट येथील ग्रा.पं.कार्यालय, राजिप शाळा घुम, राजिप शाळा रुद्रवट येथे 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण करून भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. परंतु महत्वाचे म्हणजे संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय कार्यालय, शाळा, कॉलेज अशा ठिकाणी तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना देण्यात येते. परंतु असे असले तरी ग्रामपंचायत घुम-रुद्रवट कार्यालय येथे खुद्द सरपंचच ध्वजारोहण करायला उपस्थित राहिले नसल्याने अखेर उपसरपंचांवर ध्वजारोहण करण्याची वेळ आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की घुम-रुद्रवट ग्रामपंचायतीचे सरपंच केतन आग्रे हे ग्रामपंचायत हद्दीत हजर असतानाही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यास उपस्थित राहिले नाही त्यामुळे अखेर उपसरपंच मयुर गायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरपंचांच्या अशा बेजबाबदारपणा वृत्तीमुळे नागरिकांमधून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर जनतेने विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला आपल्या कर्तव्य व जबाबदारीची जाणीव किंवा भान नसेल तर असे सरपंच किंवा अन्य लोकप्रतिनिधी त्या पदावर राहण्यास पात्र आहेत का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे तसेच सरपंच केतन आग्रे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यास अनुपस्थित राहून देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.
संबंधित घटनेची तहसीलदार व पं.स.गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराची संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी करावी आणि फोउजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
ग्रा.पं.घुम-रुद्रवट येथे घडलेल्या प्रकाराबाबत सरपंच केतन आग्रे यांना विचारले असता मला त्या ठिकाणी यायला उशीर झाला म्हणून मी ध्वजारोहण करण्यास उपस्थित राहू शकलो नाही असे बेजबाबदार उत्तर दिले आहे.
सरपंचांनी ध्वजारोहण करण्यास उपस्थित राहणे आवश्यक होते तसेच त्यांनी अनुपस्थित राहण्याबाबत माझ्याकडे तोंडी किंवा लेखी स्वरूपात कोणतेही पत्रव्यवहार केलेले नाही त्यामुळे संबंधित प्रकाराला सरपंचच जबाबदार आहेत.
-जी.टी.विरकुडग्रा, मसेवक - ग्रा.पं.घुम-रुद्रवट

Post a Comment