दिघी : गणेश प्रभाळे
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिलेले असून सदर निर्देशांचे अनुषगाने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघांतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम जनजागृती करण्यात आली.
सदर जनजागृती मोहिमेअंतर्गत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात असलेल्या सर्व मतदान केंद्र असलेल्या गावांमध्ये 21 महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याची सुरुवात दिनांक 17 जानेवारी रोजी बोर्लीपंचतन येथील मोहनलाल सोनी विद्यालय येथून करण्यात आली. सदर प्रसंगी नियुक्त पथकातील प्रशिक्षित बोर्लीपंचतन मंडळ अधिकारी सुनील मोरे, तलाठी निलेश पवार, सुनील भगत, दत्ता करचे, रेश्मा विरकुट व तलाठी संदीप मोरे या कर्मचार्यांमार्फत जनजागृती व प्रशिक्षण प्रयोजनार्थ उपलब्ध करून दिलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असून मतदारांना व विध्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष मतदान करून घरोघरी आपल्या कुटुंबातील मतदारांना प्रक्रिया समजून देण्याची संधी असणार आहे. प्रत्येक गावात दवंडी देऊन सदर मोहिमेबाबत पूर्वसूचना देण्यात येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदाराने कोणत्या उमेदवारास मतदान केले हे व्हीव्हीपॅटवर सात सेकंद दिसणार असल्याने मतदारांनी कशाप्रकारे मतदान करावे, निवडणुकीत ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅटचा वापर कसा होणार आहे, याविषयी मतदारांना माहिती दिली जात आहे. सदर मोहीम सुमारे 40 दिवस सुरू राहणार असून प्रथम टप्प्यात तालुक्यातील गावांमधील पाच ते सहा प्रमुख ठिकाणी पथकांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. सदर जनजागृती मोहीम ही प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
जनजागृतीकरिता निश्चित केलेल्या ठिकाणी नागरिकांनी व सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटद्वारे पार पाडण्यात येणार्या मतदान प्रक्रिया पथकातील प्रशिक्षित कर्मचाऱयांकडून समजून घेऊन मतदान यंत्रावर प्रत्यक्ष मतदान करून पाहावे .असे मंडळाधिकरी मोरे अण्णा यांनी नागरिक व राजकीय पक्षांना आवाहन केलेले आहे. बोर्ली येथे प्रशिक्षण दरम्यान उपस्थित सरपंच गणेश पाटील, राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष महमद मेमन, श्रीराम तोडणकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष उत्तम दिवेकर, पोलीस पाटील उद्देश वाघजे, पत्रकार अभय पाटील, मुख्याध्यापक पोटे सर, वैभव शिलकर, सुशील पाटील इ. शिक्षकवृंद, मान्यवर व मतदार उपस्थित होते.


Post a Comment