म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दि.12 जानेवारी पासून सप्ताह सुरू असून या कार्यक्रमाला पाचव्या दिवशी तालुक्यातील सर्व पत्रकारांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते शाळेचे माजी विद्यार्थी मनोहर तांबे उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे व कलादालनाचे तसेच प्रेस क्लब अध्यक्ष अशोक काते यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते मनोहर तांबे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर लिहिलेले पुस्तके, आत्मचरित्र, वेगवेगळ्या लेखकांनी तयार केलेले संग्रह यांचे वाचन करून स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करायला पाहिजे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. तसेच शाळेशी आणि शिक्षकांशी आजीवन अतूट नाते जोपासले पाहिजे आणि शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचे आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे उपयोग करून शिक्षकांचे व शाळा, महाविद्यालयाचे नाव उज्वल केले पाहिजे असे सांगताना विद्यालयाची होत असलेली प्रगती समाधानकारक आहे असे सांगितले तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित वेगवेगळे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यागाचे व सत्कार्याचे महत्व समजावून दिले.
त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणात संजय खांबेटे यांनीही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर वेगवेगळी उदाहरणे देऊन डॉ.बापूजी साळुंखे यांच्या बद्दल आठवणी सांगितल्या तसेच महाविद्यालयात नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जात असल्याने प्राचार्य, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे कौतुक केले तसेच विद्यालयाच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
प्रेस क्लब अध्यक्ष अशोक काते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सामाजिक जीवनात कार्यरत असताना शाळेतील संस्कारामय शिकवणीचा खूप फायदा होत असून या शाळेतील शिक्षकांच्या शिकवणीमुळे आपण विविध क्षेत्रात काम करीत असून अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहेत याचे सारे श्रेय संस्थेला, शिक्षकांना जात असल्याचे सांगितले. संस्थेचे चेअरमन समिर बनकर यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती व संस्थेप्रती असलेली बांधिलकी जपत शाळेच्या अडीअडचणीत सहकार्य केले पाहिजे असे सांगून शाळेच्या नावलौकिकात पत्रकार महत्वाची भूमिका बजावीत असल्याचे सांगितले. प्राचार्य बी.एन.माळी यांनी सप्ताह निमित्ताने विद्यालयात करियर मार्गदर्शन, गायन, वादन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, प्रश्न मंजुषा, निबंध स्पर्धा, फनी गेम्स, चित्रकला, वक्तृत्व, विवेकानंद टॅलेंट सर्च स्पर्धा, पाककला, रांगोळी, वेशभूषा, केशभूषा, ग्रंथप्रदर्शन, हळदकुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धा व कार्यक्रमांनी स्वामी विवेकानंद सप्ताह साजरा करण्यात येत असल्याची माहिती देऊन उपस्थितीतांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.पाटील सर यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय खांबेटे, चेअरमन समिर बनकर, प्रेस क्लब अध्यक्ष अशोक काते, जेष्ठ पत्रकार उदय कळस, प्राचार्य बी.एन.माळी, प्रमुख वक्ते मनोहर तांबे, पत्रकार निकेश कोकचा, पत्रकार शशिकांत शिर्के, प्रा.शेख सर, शिक्षक कदम, पाटील यांसह सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment