म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
केंद्रात आणि राज्यात भाजप - शिवसेनेचे युती सरकार असून दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी व मंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमात एकमेकांच्या विरोधात बोलून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतात तर दुसरीकडे सत्तेच्या सिंहासनावर हेच मंत्री एकत्र मांडीला मांडी लावून बसताना देखील दिसतात. दोन्ही पक्षाचे मंत्री सत्तेत सहभागी असतानाही न झालेल्या कामांचे किंवा प्रकल्पांचे खापर मात्र एकमेकांवर फोडत असतात याचेच प्रत्यय शिवसेनेचे नेते, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री तथा रायगडचे खासदार अनंत गीते यांना विचारलेल्या एका प्रश्नाच्या स्पष्टीकरणातून दिसून आले.
केंद्रीय मंत्री अनंत गीते हे दि.11 जानेवारी रोजी म्हसळा तालुक्यातील खाडीपट्टा दौऱ्यावर आलेले असताना माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी अनंत गीते हे सहा वेळा खासदार व दोन वेळा केंद्रीय मंत्री होऊनही त्यांना रायगड मधे एकही कारखाना आणता आला नाही या प्रश्नावर बोलताना खासदार गीते यांनी सांगितले की कोकणात एखादा तरी कारखाना आणावा अशी माझी मनापासून इच्छा होती आणि मला जिल्ह्यातील तरुणांचे रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी कारखाना आणायचा होता त्यासंदर्भात मी प्रस्तावही तयार केला होता परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेमुळे मला रायगड जिल्ह्यात एकही कारखाना आणता आला नाही अशी स्पष्ट कबुली अनंत गीते यांनी दिली तसेच आपण पुन्हा लोकसभा निवडणूक निवडून आल्यावर खाजगी क्षेत्रातील एखादा तरी कारखाना नक्कीच आणणार असे मत व्यक्त केले. तसेच आगामी निवडणूका शिवसेना स्वबळावर लढविणार असून रायगड मधे शिवसेना व काँग्रेस आय यांच्यात झालेल्या युतीबाबत बोलताना गीते यांनी सांगितले की राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होवो किंवा न होवो तो त्यांचा प्रश्न असून याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही तर रायगड मधील काँग्रेस ही राष्ट्रवादीच्या सोबत नसून प्रत्यक्षरित्या काँग्रेस पक्षाची मलाच साथ मिळणार असून माझ्या विजयात काँग्रेसचा देखील सिंहाचा वाटा असेल आणि म्हणूनच काँग्रेसवाले शिवसेनेच्या अनंत गीते यांनाच मतदान करतील असा विश्वास काँग्रेस-शिवसेना युतीवर व्यक्त केेला. त्याचबरोबर रायगडमधील प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांच्याबाबत बोलताना गीते यांनी सांगितले की मी सुनिल तटकरे यांना माझा प्रतिस्पर्धी कधीच मानले नाही आणि आताही मानत नाही उलट तटकरेंना पुन्हा पराभव पत्करायचा असल्यानेच ते निवडणुकीला उभे राहणार आहेत असा टोला लगावला. तसेच दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅ.अंतुले साहेब आणि माझे जवळचे चांगले संबंध होते म्हणूनच मी त्यांचे सुपुत्र नविद अंतुले यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी आलो असे गीते व अंतुले भेटीबाबत स्पष्टीकरण दिले.

● रायगडचे खासदार अनंत गीते साहेबच होणार - नविद अंतुले
● काँग्रेस-राष्ट्रवादी की आघाडी होगी तब देखेंगे - अंतुलेचे सूचक वक्तव्य
आंबेत येथील निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप करताना माजी माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांचे सुपुत्र युवानेते नविद अंतुले यांनी सांगितले की रायगड मधे काँग्रेस शिवसेना युती भविष्यात कायम राहील आणि याची सुरुवात आम्ही आंबेत ग्रामपंचायत निवडणुकीतून केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना मदत करून दीड लाख मतांच्या फरकाने विजयी करू आणि रायगडचे खासदार अनंत गीते हेच होणार असा विश्वास व्यक्त केला तसेच राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या होणाऱ्या आघाडी बाबत बोलताना अंतुले यांनी सावध पवित्रा घेऊन पक्षाचा आदेश पाळण्याच्या दृष्टिकोनातून सूचक वक्तव्य केले की जब काँग्रेस और राष्ट्रवादी की आघाडी होगी तब देखेंगे किसको मदत करना है... नविद अंतुले यांच्या या विधानाने उपस्थित काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले आहेत.

Post a Comment