म्हसळ्यात शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे ; शिक्षकांची लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली : विद्यार्थ्यांचे होतंय शैक्षणिक नुकसान

Image result for shikshak

● तूर्त वर्ग अध्यापणास नेमलेले 6 शिक्षक चार महिन्यांपासून हजरच झाले नाहीत

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

     म्हसळा तालुक्यातील शिक्षण विभागाचा विविध समस्यांचा दुष्काळ काही संपल्या संपत नाही. शाळांमध्ये कार्यरत असलेले अनेक शिक्षक स्वतःच्या मनमर्जीने वागत असून वरिष्ठ अधिकारी किंवा सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्या आदेशाचे पालन करीत नाहीत उलट शिक्षण विभागाने दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखवत असल्याने या शिक्षण विभागाच्या कारभारावर तालुक्यात कोणाचाही अंकुश राहिला नसून शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे. 
  शिक्षक संख्या कमी, केंद्रप्रमुख पदे रिक्त, गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी अशी अनेक पदे रिक्त आहेत. तालुक्यातील ज्या शाळांमध्ये 0 ते 10 पर्यत विद्यार्थी संख्या आहे त्या शाळेतील 6 शिक्षकांना तूर्त वर्ग अध्यापणासाठी ज्या शाळेत शिक्षक कमी आहेत व विद्यार्थी संख्या जास्त आहे अशा शाळांमध्ये अध्यापणासाठी जाण्याचे आदेश शिक्षण विभागाने दोन महिन्यांपूर्वी दिलेले आहेत परंतु हे 6 शिक्षक अद्यापही नेमुण दिलेल्या शाळेत हजर झालेले नाहीत त्यामुळे या 6 शिक्षकांनी शिक्षण विभागाचे आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. शिक्षण विभागाच्या या महत्वाच्या प्रश्नासंदर्भात पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थरावर पालकांनी मागणी करूनही हा प्रश्न अद्याप सुटत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून या विभागाच्या अंधाधुंदी कारभाराला जबाबदार कोण हा सवाल उपस्थित होत असून या विभागाला वाली कोण राहिला नाही अशी खोचक प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. 
तर पंचायत समितीच्या मासिक सभेला जिल्हा परिषद सदस्य, सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व अन्य अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत ठराव घेऊनही काही शिक्षक पंचायत समिती किंवा शिक्षण विभागाचे आदेशाचे पालन करीत नसल्याने सत्ताधारी लोकप्रतिनिधी व तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी यांचे तालुक्यातील कर्मचारी वर्गावर अंकुश राहिला नसून लोकप्रतिनिधींच्या शब्दाला किंमत देत नसल्याची वस्तुस्थिती असून प्रशासनावर कोणाचाही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. 
तालुक्यातील खरसई मराठी शाळा येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा असून या ठिकाणी मंजूर पदांपैकी 2 शिक्षक कमी आहेत तर तोराडी मराठी शाळा येथे पहिली ते सहावी पर्यंत वर्ग असून याठिकाणी फक्त एकच शिक्षक कार्यरत आहे अशा अनेक शाळांची शिक्षकांविना परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे या सर्व गंभीर परिस्थितीकडे तालुक्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या समस्या सोडविल्या पाहिजेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


आमच्या खरसई शाळेत पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु याठिकाणी दोन शिक्षकांची कमतरता आहे आम्ही अनेक वेळा शिक्षण विभागाला याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे मागील दोन महिन्यांपूर्वी तालुका स्थरिय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम प्रसंगी गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांनी दोन दिवसांत शिक्षक उपलब्ध करून देतो असे सांगितले होते परंतु अद्यापही आमच्या शाळेवर शिक्षक उपलब्ध झालेले नाहीत. शिक्षक संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
-श्री.निलेश मांदाडकर, अध्यक्ष - शाळा व्यवस्थापन समिती खरसई

तालुक्यातील ज्या शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी आहेत त्या शाळांवर तूर्त वर्ग अध्यापन साठी 6 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे यासंदर्भात पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेण्यात आलेले आहेत तसेच त्या 6 शिक्षकांना नेमुण दिलेल्या शाळांवर हजर राहण्यास सांगण्यात आले होते परंतु जर हे शिक्षक अजून हजर झाले नसतील तर त्यांच्यावर शिक्षण विभागाला कारवाई करण्याचा सूचना देण्यात येतील.
 -श्री.संदिप चाचले, उपसभापती - पंचायत समिती म्हसळा

म्हसळा तालुक्यातील ज्या 6 शिक्षकांची तूर्त वर्ग अध्यापणासाठी शिक्षण विभागाकडून नेमणूक करण्यात आली आहे त्यांची याबाबत सविस्तर सर्व माहिती घेऊन जर हे शिक्षक कामात हलगर्जीपणा करीत असतील किंवा शिक्षण विभागाचे आदेशाचे पालन करीत नसतील तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-श्रीमती शैलजा दराडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक अलिबाग रायगड

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा