व्यक्तिविशेष - मधुकर रिकामे ; उतुंग विचारशक्तीचे उमदे व्यक्तिमत्व : Mhasla Live.


टीम म्हसळा लाईव्ह
नमस्कार मित्रहो, व्यतिविशेष या सदरात आपण नेहमीच एक वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देत असतो. खरंतर पडद्यामागे असलेले चेहरे फार क्वचितच समोर येतात आणले जातात. त्याच अनुषंगाने आज च्या या विशेष सदरात आपण भेटणार आहोत आदित्य पब्लिसिटी &  मीडिया सर्विसेसचे मधुकर रिकामे यांना. कोंकण च्या मातीत जन्मलेल्या या भारदस्त व्यक्तिमत्त्वाला बोलत केलंय टीम म्हसळा Live ने.

म्हसळ्यातील जांभूळ मध्ये जन्मलेले मधुकर रिकामे यांनी आपलं सातवी पर्यंतच शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली. आणि खेतवाडी युनियन हायस्कूल मधून पुढील शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. बारावी साठी ठाण्यात आले, पण आयुष्यातील चढ उतारांचा सामना करत ६ महिने मुंबईत आणि ६ महिने गावी अशी तारेवरची कसरत करून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. आणि पदवी साठी पुन्हा मुंबई गाठली. नाईट कॉलेज मधून घेतलेली पदवी, वडीलांचा बंद पडलेला व्यवसाय, नोकरीत स्थिरावल्यानंतरही कन्फर्म असलेली नोकरी गमावली, त्यातून उभं राहत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे, तरुणांसाठी प्रेरणास्थान असलेले आदित्य पब्लिसिटी &  मीडिया सर्विसेसचे मधुकर रिकामे यांच्याबद्दल जाणून घेऊ...

तुमच्या बालपणीच्या आठवणी किंवा बालपणाबद्दल काय सांगाल...?
जांभूळ माझं जन्मगाव तिथंच रायगड जिल्हा परिषद शाळेत माझं सातवी पर्यंतच शिक्षण पूर्ण झालं आणि मग पुढील शिक्षणासाठी मुंबईत आलो. खेतवाडीच्या युनियन हायस्कूल मधून पुढचं शिक्षण झालं. मुंबईत खेतवाडी परिसरात वडिलांचा दुधाचा व्यवसाय होता. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ठाण्यात आलो बारावीचे सहा महिने मुंबईत तर सहा महिने गावी असं करून बारावी पूर्ण केली. मधल्या वेळेत आरे ची स्थापना झाली आणि आरे च दूध बाजारात आल्याने आमच्या वडिलांच्या दूध व्यवसायाला उतरती कळा लागली. वडील इकडे तिकडे छोटी मोठी मिळेल ती नोकरी करू लागले.
जाहिरात

मग गावाकडून पुन्हा मुंबईकडे कसे वळलात...?
गावी श्रीवर्धन मध्ये वडिलांच्या शिक्षक मित्राकडे बाबांनी माझी राहण्याची सोय केली होती. मग बारावीचे ते सहा महिने काढले परीक्षा उत्तीर्ण झालो आणि पोटाची खळगी भरण्यासाठी थेट मुंबई गाठली. मुंबई च्या कांदिवली मध्ये येऊन स्थिरावलो मग कांदिवली ते नरीमन पॉईंट रोजचा प्रवास. दिवसभर ऑफिस मध्ये काम आणि रात्री पुन्हा कॉलेज. कोकणातल्या प्रशस्थ घरातून कंदिलाच्या १० बाय १० च्या खोलीत आम्ही स्वतःला ऍडजस्ट केलं. वाचनाची प्रचंड आवड होती त्यामुळे मुंबई ग्रंथ संग्रहालयातच पडीक असायचो. नाईट कॉलेज मधून पदवी घेतली आणि सोबतच एक्स्पोर्ट मॅनेजमेंट चा कोर्स पूर्ण केला. मग मधल्या काळात कार्बन कॉर्पोरेशन मध्ये नोकरी लागली. लग्न झालं आणि नोकरीत स्थिरावलो.

आयुष्यातील खडतर प्रसाबद्दल काय सांगाल...?
खरंतर सगळं सुरळीत सुरू असताना कंपनी च्या मॅनेजमेंट मध्ये बदल झाले आणि नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर आयुष्यात खूप खस्ता खाल्या पण पत्नीने साथ दिली आणि आम्ही त्यातून सावरू शकलो. नोकरी गेल्यानंतर मी वडापाव ची गाडी टाकली. अगदी 3 - 4 महिने केलीही पण अविरत सुरू ठेवणं आम्हाला जमलं नाही. मग पत्नी च्या साथीने मुंबईत शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मेस सुरू केली. त्यांना जेवणाचा डब्बा पुरवू लागलो आणि आमचं उदरनिर्वाह करत होतो. आमच्या सौ. स्वाध्याय परिवाराशी जोडल्या होत्या मग आम्हीही जोडले गेलो आणि नैराश्याच्या काळातही जगण्याची ऊर्जा उमेद मिळत होती. आमचे आध्यात्मिक प्रेरणास्थान रेमॉन मॅगसेसे जागतिक पुरस्कार विजेते आदरणीय दादा पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले. हळूहळू सगळं सुरळीत होऊ लागलं नवे शहर पासून मी न्युज पेपर मध्ये काम करायला लागलो. मिळेल ते काम करायचे अगदी प्रूफ रिडींग पासून वितरणा पर्यंत. काही वर्ष तिथं काम केल्यानंतर नवभारत हिंद आवृत्ती मध्ये जॉईन झालो. प्रिंटिंग च्या कामामुळे अनेक छोट्या मोठ्या पत्रकारांशी ओळख वाढली आणि तीच ओळख आज आदित्य पब्लिसिटी &  मीडिया सर्विसेस या माझ्या कंपनी साठी महत्वाची ठरते.

आयुष्यातील टर्निंग पॉईंट कोणता....?
नवभारत मध्ये काम करत असतात माझे आदर्श असलेले श्री सुनील कृष्णाजी पोद्दार साहेबांशी ओळख झाली आणि मी रायगड नागरी जॉईन केली. सुरुवातीला अगदी वितरणा पासून सगळी काम केली मग हळूहळू जबाबदारी वाढत होती. त्या काळी वितरण करण फार अवघड होतं. आज च्या सारख्या इंटरनेट ची सुविधा नव्हती. अगदीच खेड्या पाड्यात वड्या वस्तीवर जाऊन आम्ही रायगड नागरी पोहोचवायचे.

राजकारणा बद्दल काय सांगाल..?
१९८८ साली पांडुरंग चौलकरांनी भाजपची ऑफर दिली होती पण राजकारणात प्रवेश करावा असा तेव्हाही वाटत नव्हतं आणि आजही वाटत नाही. पण राजकीय सल्लागार म्हणून काम करायला आवडत. आजच्या तरूणांनी राजकिय तरुणांनी राजकिय हितसंबंध जोपासावे आणि आपल्या विभागाचा गावाचा विकास साध्य करून घ्यावा. आपली अवस्था त्या कडीपत्त्या सारखी असता कामा नये.

तरुणांना काय सल्ला द्याल...?
जीवनात आध्यात्म हे हवंच. तुम्ही कुठेही जा, कितीही प्रगती करा पण किमान २५% वेळ हा आध्यात्मिकतेला द्यायला हवा. आध्यात्माने नैराश्य दूर होऊन उत्साह वाढतो. सोशल मीडिया ही विज्ञानाची देणगी आहे पण ते वापरताना सामाजिक भान ठेवून वापरले पाहिजे. कोकणातील तरुणांनी नोकरीसाठी मुंबईत न येता आपल्याच विभागात रोजगार निर्मिती कशी होईल याकडे लक्ष द्यायला हवे. मी तर सांगेन तरुणांनी माणगाव मधील सुजित भोजने या तरुणाचा आदर्श घ्यायला हवा. रोहा ते अंधेरी असा प्रवास करून त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि आता एरेना अनिमेशन नावाचं स्वतःच क्लास सुरू केलय. गावी राहून नोकरी न करता आपण वेगळं काय करू शकतो याचा विचार तरुणांनी करायला हवा. मागे एकदा मी श्रीवर्धन मध्ये गेलो होतो तिथं फालुदा आईस्क्रीम ची गाडी (टेम्पो) संभाळणार आपला एक तरुण दिसला उत्सुकता म्हणून मी त्याची विचारपूस केली काय कसं चाललंय मिळवतोस ना बऱ्यापैकी..? तर त्यावर तो म्हणाला ही गाडी माझी नाही मी इथं काम करतो ४०० रुपये रोजंदारी वर. हे उदाहरण सांगण्याच कारण म्हणजे तोच व्यवसाय तोही करू शकला असता. जर मालक याला ४०० पर डे देत असेल तर तो किती कमवत असेल..? परप्रांतीय येऊन करू शकतो मग आपली पोरं मागे का... याचा विचार करण्याची तरुणांना गरज आहे. 

तरुणांना योग्य प्रशिक्षण मिळतं नसल्याची ओरड नेहमीच होत असते याबद्दल काय सांगाल..?
कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही तरुणांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने विचार केला आहे. शासनाच्या मदतीने पर्यटन वाढीवर भर देण्याचा आमचा मानस आहे. आज दिवेआगर सारख गाव आहे जे १००% पर्यटनावर अवलंबून आहे. तिथली पोरं नोकरीच्या शोधात नसतात याचा कुठेतरी अभिमान वाटतो. कोंकण हा सर्व गोष्टीनी समृद्ध आहे. कोकणची माती मुबलक पाणी उपलब्ध आहे. तरुणांनी फक्त आंबा काजू च्या बागेवर अवलंबून राहू नये, या बागा जरूर वाढवाव्या खरंतर तीच आपली ओळख आहे पण आंतरपीक घेऊन पालेभाज्या फळभाज्या यांचं उत्पन्न वाढवावं. कोकण विकास आघाडी तुम्हाला मार्केट मिवळून द्यायला मदत करेल. किती दिवस आपण भाज्यांची आयातच करायची...? 

कोकण विकास आघाडी नेमकी काय आहे किंवा कश्या प्रकारे काम करते. अथवा तुम्हाला तुमच्या कोकणातील व्यावसाईक दृष्ट्या काही मदत हवी असल्यास संपर्क :- 
मधुकर रिकामे , आदित्य पब्लिसिटी &  मीडिया सर्विसेस (7039683913)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा