श्रीवर्धन : प्रतिनिधी
तालुक्यातील अनेक पाटबंधारे योजना मागील १५ ते १६ वर्षापासून लालफितीत अडकलेल्या असून योजना अर्धवट आहेत . तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या कालखंडात श्रीवर्धन तालुक्यातील वडशेतवावे मारळ या ठिकाणी धरणे बांधण्यास सुरुवात झाली होती . वडशेतवावे धरणाचे ७० टक्के काम झालेले असून निधीच्या कमतरतेमुळे व भू संपादन प्रक्रीया रखडल्यामुळे हे काम मागील १० वर्षांपासून बंद आहे . या धरणापासून कालव्याचेही खोदकाम झालेले आहे . १९८३ - ८४ च्या सुमारास शहराला पाणी पुरवठा करणारे " रानवली धरण बांधण्यात आले तर बोर्लीपंचतन गावाला पाणीपुरवठा करणारे कार्ले धरण बांधण्यात आले त्यानंतर तालुक्यात कुडकी येथे धरण झाल्यानंतर तालुक्यात एकही धरण बांधण्यात आलेले नाही . रानवली धरणाची निर्मिती झाली . त्यावेळी श्रीवर्धन शहराची लोकसंख्या अत्यंत कमी होती . परंतु शहरात वाढलेली लोकसंख्या , वाढते शहरीकरण यामुळे आजमितीला रानवली धरणाचे पाणी शहराला अपुरे पडत आहे वडशेतवावे धरणातून कालव्याने पाणी रानवली धरणात सोडण्याची योजना तयार करण्यात आली होती . त्यामुळे श्रीवर्धन शहरवासियांना मुबलक पाणी उपलब्ध होणार होते पण वडशेतवावे धरणाचे काम रखडल्याने श्रीवर्धन शहरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते . मारळ धरणसुद्धा रखडल्याने दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर गावात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते श्रीवर्धन तालुका पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने चांगलाच प्रसिद्ध झाला आहे परंतु , जलसंपदा विभागाचे याठिकाणी दुर्लक्ष होत असल्याने किंबहुना या मतदारसंघातून कोणतेही नेतृत्व सक्षम नसल्याने याठिकाणी विकास खुंटला आहे . तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्प पुर्णत्वास गेल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली येण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे . त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात दुबार भातशेतीचे पिक घेणे शक्य होणार आहे . श्रीवर्धन तालुक्यात ज्या शेतजमिनीत पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी भातशेती कापून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकविला जातो . पण असे क्षेत्र कमी असल्याने भाजी पुणे किंवा वाई येथून आणावी लागते तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाल्यास श्रीवर्धन तालुक्यात बाहेरून भाजीपाला आणण्याची गरज भासणार नाही . याठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास सर्व प्रकारच्या पालेभाज्या व भाज्या केवळ शेणखत किंवा गोमूत्र खताने तसेच मासळीच्या खाताने उत्तम दर्जाच्या पिकतात रासायनिक खतांचा वापर न करता आरोग्याच्या दृष्टीने चांगली भाजी उपलब्ध होऊ शकते . त्यामुळे या पाटबंधारे योजना पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे
Post a Comment