गोवर रुबेला लसीकरण मोहिमः जिल्ह्यात आजअखेर 4 लाख 67 हजार बालकांना लसीकरण


संजय खांबेटे : म्हसळा 
भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात बुधवार (दि.19 डिसेंबर) अखेर जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 715  बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

 जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (बुधवार दि.19) दिवसाअखेर जिल्ह्यातील 112 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 16 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1476 विद्यार्थ्यांना तर 96 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 12 हजार 904 विद्यार्थ्यांना अशा एकूण 14 हजार 380 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 7 हजार 254 मुले व 7 हजार 126 मुलींचा समावेश आहे.  तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 42 हजार 929 मुले  व 2 लाख 24  हजार 786 मुली असे एकूण 4 लाख 67 हजार 715 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.  या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 4779 शाळांपर्यंत पोहोचली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा