रथोत्सवात मुखदर्शनासाठी भाविकांची गर्दी स्वागतासाठी सर्वत्र विद्युत रोषणाई, फुलांचे व रांगोळ्यांचे सडे


श्रीवर्धन प्रतिनिधी


श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सोमजाई मातेचा रथोत्सव संपन्न झाला. यावेळी सोमजाईच्या गजरात अवघा श्रीवर्धन शहर दुमदुमून गेला होता. श्रीवर्धनची जागृत ग्रामदेवता आई सोमजाई देवीचा रथोत्सव मार्गशीर्ष कृष्णपक्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष दशमी या कालावधीत संपन्न होतो. या दिवसात रात्रंदिवस भजन करून देवीचा जागर करण्यात येतो. नवमीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यंदादेखील लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
महाराष्ट्रातील नावाजलेले तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून श्रीवर्धन शहर प्रसिद्ध आहे. पुराण व उपनिषदांत श्रीवर्धनचा उल्लेख आढळतो. अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने श्रीवर्धनची भूमी पवित्र झाली आहे. अगस्ती मुनींनी आई सोमजाई मातेची स्थापना केली असा इतिहास आहे. दक्षिण काशी हरिहरेश्वर श्रीवर्धन तालुक्यात वसलेले आहे. देवस्थानाच्या चतु:सीमेस चार शिवशक्ती आहेत. कंकाळी, भद्रकाली, कात्यायनी, चामुंडायनी अशी असून मुख्य देवता मंदिरात श्री सोमजाई या नावाने प्रसिद्ध आहे. श्री सोमजाई शाळीग्राम रुपात असून शिव, भवानी, नंदी व वासुकी या चार शक्ती एकत्र आहेत.
श्रीवर्धन शहरात पूर्वी प्लेगची साथ प्रतिवर्षी येत असे, तेव्हा गावसयने श्री सोमजाई देवीला मनोभावे प्रार्थना करून शालिवाहन शके 1799 मध्ये सप्ताह उत्सवाला सुरुवात करून रथ उत्सवाला प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे आईच्या रथातील दर्शनासाठी देशी परदेशी कामानिमित्त गेलेले चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात. यंदा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष नवमीला रविवारी (दि.12) रथोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी आई सोमाजाई देवीच्या स्वागतासाठी श्रीवर्धनमध्ये सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर सर्वत्र रांगोळी व फुलांचे सडे काढुन परिसर सजविण्यात आला होता. दशमीला दुपारी रथोत्सव सप्ताहाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा