समुद्र किनार्यावर करत होते ड्रोनने फोटोग्राफी : हटकण्याचा आला राग तीनजण अटकेत
श्रीवर्धन प्रतिनिधी
श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक सूरज खेडेकर यांच्यावर पुण्यातील पर्यटकांनी हल्ला करत त्यांना वेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ( दि . ४ ) सायंकाळी घडली आहे . ड्रोनने शूटींग करताना हटकल्याने ही मारहाण करण्यात आली असून , यामध्ये खेडेकर यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत . याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक खेडेकर यांना दोन - तीन दिवसांपूर्वी श्रीवर्धन समुद्र किनार्यावर काही पर्यटक दारु पिऊन दंगा करत असल्याची माहिती स्थानिक ज्येष्ठ नागरिकांकडून मिळाली होती . त्यांच्या हालचाली संशयास्पद असून काहीही घडू शकते , अशी भितीही श्रीवर्धनमधील स्थानिकांनी व्यक्त केली होती . त्यामुळे खेडेकर हे सहकाऱ्यांसह मंगळवारी सायंकाळी या ठिकाणी पेट्रोलिंगकरिता गेले . यादरम्यान सात ते आठजणांचा पर्यटकांचा ग्रुप श्रीवर्धन समुद्र किनार्यावर दंगा करत असल्याचे तसेच ते ड्रोनद्वारे या परिसरात शूटींग करत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले . म्हणून पोलीस निरीक्षक खेडेकर त्या ठिकाणी गेले व त्यांना हटकले . अशाप्रकारे शूटींग करता येणार नाही , त्यासाठी परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले . त्यावेळी या पर्यटकांनी अरेरावीची भाषा वावरण्यास सुरुवात केली . सहाजणांनी खेडेकर यांच्या अंगावर धावून जात त्यांना वेदम मारहाण केली . यामध्ये त्यांना गंभीर दुखापती झाल्या असून , हातही फ्रेंक्चर झाला आहे मारहाण करणार्यांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता , अशी माहिती पोलीस निरीक्षक खेडेकर यांनी दिली आहे दरम्यान , याप्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून , रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती .

Post a Comment