● चार लाख रुपये घातले खड्डयात...?
● बांधकाम खात्याचे दुर्लक्ष का..?
● कामाबाबत माहिती देण्यास अधिकाऱ्यांचा नकार
● ठेकेदारावर मेहरनजर कोणाची..?
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा तालुक्यात मागील काही वर्षांपासून विकासाची गंगा वाहत असल्याची जोरदार चर्चा सुरू असून काही प्रमाणात ही वस्तुस्थिती खरी असली तरी या विकास गंगेच्या पाण्याचा लाभ मुख्यतः कोणाला होत आहे हा तालुक्यात संशोधनाचा विषय ठरला असून जनसामान्यांमधून यावर उलट - सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. म्हसळा तालुक्यात आजपर्यंत विविध खात्यांमार्फत करोडो रुपयांची अनेक विकासकामे मंजूर झालेली आहेत यामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून मंजूर करण्यात आलेली बहुतांश कामे अपूर्ण अवस्थेत आहेत तर काही कामे प्रगतीपथावर असून काही कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. यामधील अनेक कामांचे भूमिपूजन करून वर्ष व्हायला आले तरी अद्याप कामे करायला संबंधित ठेकेदारांनी सुरुवात केलेली नाही ही देखील शोकांतिका आहे. तसेच ठेकेदारांनी केलेली काही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची करून कामांना थुकपट्टी लावण्याचे काम केले आहे त्याचबरोबर ज्या पक्षाचे माध्यमातून कामे झालेली आहेत त्या पक्षाचे काही लोक व ठेकेदार यांच्यात असलेले घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध व त्यांना मिळालेली अधिकारी वर्गाची साथ या मुळे 'तेरी भी चूप मेरी चूप' असे करून मंजूर विकासनिधीचा गैरवापर करीत आहेत.
तालुक्यातील निकृष्ट दर्जाची कामे कशी होत आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग मधून मंजूर करण्यात आलेले 4 लक्ष रुपये खर्चाचे ग्रामपंचायत ठाकरोली हद्दीतील कोकबल ते सांगवड या मुख्य रस्त्यावरील खड्डे भरणे हे काम होय. ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे त्याने अक्षरशः या कामात थुकपट्टी लावून स्थानिक जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असून शासनाच्या निधीची लयलूट करून चार लाख रुपये खड्ड्यात घातले आहेत त्यामुळे अशा ठेकेदारांवर मेहेरनजर कोणाची आहे हा प्रश्न निर्माण झाला असून रस्त्याच्या कामाबाबत माहिती देण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी श्री.शेटे यांची नकारात्मक भूमिका आहे. सद्यस्थितीत या रस्त्याची अवस्था अशी आहे की मुळात हा रस्ता डांबरी रस्ता आहे की नाही हेच दिसत नाही त्यामुळे या रस्त्याचे खड्डे भरणे हा विषयच गौण आहे असे असतानाही निव्वळ ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी या खड्डे भरण्याचे कामाला मंजुरी दिली आहे का असा संतप्त जनक सवाल या पंचक्रोशीतील नागरिक करीत आहेत.
रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहिला तर खड्डे भरण्यासाठी वापरण्यात आलेली खडी, ग्रीट, डांबर व इतर साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असून हा रस्ता अनेक वर्षांपासून डांबरीकरण केलेला नसल्याने सध्या रस्ता लाल मातीचा झाला आहे आणि याच रस्त्यावर पुन्हा खड्डे भरण्याचा नावावर लाखो रुपये खर्च दाखवून बांधकाम विभाग अधिकारी शासनाच्या निधीचा गैरवापर करीत आहेत. अशा अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांमधून होत आहे. तसेच रस्त्याच्या कामाबाबत बोलताना जर बांधकाम विभागाला जर खड्डयात खडी आणि ग्रीट रेती टाकायची होती तर आमच्या ग्रामस्थांना सांगितले असते तर आम्ही श्रमदानातून सुद्धा हे काम केले असते अशी संतप्त जनक प्रतिक्रिया ठाकरोली गाव अध्यक्ष विनायक खेरटकर, मुंबई अध्यक्ष राजू जाधव, कोकबल गाव अध्यक्ष दिलीप मांडवकर या जेष्ठ नागरिकांनी दिली आहे.
रस्ता नव्याने डांबरीकरण करण्यासाठी करोडो रुपये मंजूर आहेत.... कोकबल ते सांगवड रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम केले आहे तो मुख्य रस्ता प्रजिमा - 75 मधून नेवरूळ, कोकबल, सांगवड, बंडवाडी रस्ता डांबरीकरण करणे या नावाखाली कोटी रुपये मंजूर करून नुकत्याच मे महिन्यात या रस्त्याच्या कामाचा पहिला टप्पा डांबरीकरण करण्यात आला आहे त्यामुळे सदर रस्त्याचे करोडो रुपयांचे नव्याने डांबरीकरण काम मंजूर असताना याच रस्त्यावर 4 लाख रुपये बोगस खड्डे भरण्याच्या नावावर खर्च करण्याची घाई बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना का लागली आहे हा प्रश्न गुलदस्त्यात असून तालुक्यात या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम चर्चेचा विषय ठरला आहे.
कोकबल ते सांगवड रस्त्याचे खड्डे भरण्याच्या कामाची कोणतीच कल्पना नाही तसेच ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे त्याची व संबंधित अधिकारी यांची सखोल चौकशी करण्यात येईल. तालुक्यात होत असलेली निकृष्ट कामे याबाबत कोणत्याच अधिकारी वर्गाला पाठीशी घातले जाणार नाही.
-श्री.बबन मनवे, सदस्य - रायगड जिल्हा परिषद
कोकबल ते सांगवड संबंधित रस्त्याची पाहणी मी स्वतः करून आलो असता असे दिसून येत आहे की ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले आहे तसेच त्या रस्त्यावर मुळात छोटे खड्डेच नाहीत तर उलट संपूर्ण रस्ताच उखडला असून नव्याने डांबरीकरणास मंजुरी मिळाली असताना त्याच ठिकाणी 4 लाख रुपये खर्च करण्याची गरजच नव्हती त्यामुळे संबंधित ठेकेदार व बांधकाम विभाग अधिकारी यांची चौकशी करण्यात येईल.
-श्री.संदिप चाचले, उपसभापती - पं.समिती म्हसळा
म्हसळ्यात शासकीय निधीतून होत असलेली विविध विकासकामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या सातत्याने तक्रारी नागरिकांमधून येत आहेत त्यामुळे ज्या कामाशी ठेकेदार व अधिकारी संबंधित असतील त्यांची चौकशी समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात येईल तसेच या सर्व बाबींचा अंतर्मुख होऊन शोध घेतला तर सद्यस्थितीत स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा कोणत्याच अधिकारी वर्गावर वचक राहिला नसून अधिकारी लोकप्रतिनिधींच्या शब्दाला किंमत देत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
श्री.कृष्णा कोबनाक, उपाध्यक्ष - भाजप रायगड जिल्हा
● आमच्या विभागात कोणतेही काम करीत असताना आम्हाला विश्वासात न घेताच ठेकेदार व अधिकारी लोक कामाला सुरुवात करतात तसेच कोकबल ते सांगवड या रस्त्याचे जे खड्डे भरण्याचे काम केले आहे ते अतिशय खराब असून 4 लाख रुपये निव्वळ खड्ड्यात घातले आहेत अशी अवस्था आहे. त्यामुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
-श्री.संतोष घडशी, उपसरपंच - ठाकरोली ग्रामपंचायत
● सदर कोकबल ते सांगवड रस्त्याची आम्ही पाहणी केली असून ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचे आढळून आले आहे तरी संबंधित ठेकेदाराला बिल न अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर रस्त्यावरून शाळकरी मुले, गरोदर महिला, वयोवृद्ध लोक नेहमी प्रवास करीत असल्याने रस्ता सुस्थितीत डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
श्री.सुजित काते
युवा कार्यकर्ते - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हसळा

Post a Comment