● म्हसळा प्रेस क्लबचा कौतुकास्पद उपक्रम
● पोलिसांसोबत फराळ करून दिवाळी साजरी
म्हसळा : वार्ताहर
कोणताही सण असो वा छोटा - मोठा उत्सव असो तो आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत पाहिजे तसा आनंदात साजरा करता येत नाही असे एक क्षेत्र म्हणजे पोलीस यंत्रणा आणि याच पोलीस यंत्रणेसोबत म्हसळा प्रेस क्लबच्या सदस्यांनी लक्ष्मीपूजनच्या शुभमुहूर्तावर म्हसळा पोलिस ठाण्यात पोलिसांबरोबर दिवाळी फराळ असा एक उपक्रम राबवून पोलिसांना दिवाळी सणाची मजा लुटण्याची व घरगुती बनवलेले फराळ खाण्याची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे या म्हसळा प्रेस क्लबचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमात पोलिस निरीक्षक श्री.प्रविण कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जशी जनतेच्या सहकार्याची गरज असते तशीच लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ असलेले पत्रकार यांच्या मार्गदर्शनाची व सहकार्याची देखील गरज पोलिस यंत्रणेला असते. पोलिसांना चोविस तास ऑनड्युटी काम करावे लागते तसेच एखादा सण, उत्सव आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करता येत नाही तसेच ड्युटीवर असताना मनात कितीही इच्छा असली तरी सार्वजनिक कार्यक्रमात इतर नागरिकांप्रमाणे सहभागी होता येत नाही. तर एखाद्या उत्सवाच्या ठिकाणी बंदोबस्तात असलेले आमचे पोलीस मित्र त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त त्याठिकाणी उभे राहून सण उत्सवाचा आनंद लुटत असतात अशी भावना व्यक्त केली. तालुक्यात किंवा इतर ठिकाणी काही अनैतिक घटना घडतात, कधी कधी घडणार असतात किंवा घडवून आणल्या जाणार असतात याबाबत सविस्तर माहिती पत्रकार पोलिसांना देत असतात त्यामुळे अनेक अनर्थ किंवा दुर्घटना टाळता येतात व स्थानिक पत्रकारांच्या सतर्कतेमुळे व सहकार्याने म्हसळ्यात देखील असे काही प्रकार टळले आहेत अशी आठवण करून देऊन पत्रकारांच्या कामगिरीचे कौतुक केले तसेच पत्रकारांवर खोटे आरोप किंवा हल्ले करणाऱ्यांनी पत्रकारांची भूमिका समजून घेतली पाहिजे असे सांगताना जसे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात तशीच महत्वाची भूमिका पत्रकार देखील बजावीत असतात त्यामुळे सर्वच स्थरातून पत्रकारांचा देखील आदर राखला गेला पाहिजे असे सांगून वेगवेगळ्या दुर्घटना, हल्ले किंवा अनैतिक प्रकार रोखण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पत्रकार आणि पोलीस यंत्रणा यांच्यात कायम सुसंवाद असला पाहिजे असे पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी सांगितले. तसेच पोलिसांसोबत फराळ करून दिवाळी साजरी करण्याचा म्हसळा प्रेस क्लबचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
तर कायदा आणि सुव्यवस्थेचा सर्वांनीच आदर केला पाहिजे तसेच पोलीस यंत्रणेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे असे जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांनी मनोगतात व्यक्त करताना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष अशोक काते यांनी केले तर सूत्रसंचालन सुशिल यादव यांनी केले तसेच आभार हेमंत पयेर यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, प्रेस क्लब अध्यक्ष अशोक काते, जेष्ठ पत्रकार उदय कळस, उपाध्यक्ष शशिकांत शिर्के, सचिव अंकुश गाणेकर, सहसचिव वैभव कळस, पत्रकार सुशिल यादव, पत्रकार हेमंत पयेर, पत्रकार श्रीकांत बिरवाडकर, पत्रकार अरुण जंगम यांसह पीएसआय शयबाझ शेख, पोलीस नाईक शामराव कराडे, हवालदार सुनिल खंदारे, पो.कॉन्स्टेबल रावजी राठोड, पो.कॉन्स्टेबल कमलाकर लकज, महिला पो.कॉन्स्टेबल वैशाली वारगुडे व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment