● मैदानावर धनंजय मुंडेंची विविध आंदोलनकर्त्यांना भेट
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या आंदोलनाला काल राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली. गेल्या चार वर्षांपासून 23 हजार संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून नियुक्ती मिळावी यासाठी संगणक परिचालक निकराचा लढा देत आहेत. मात्र सरकार त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. डिजिटल इंडियाचा नारा जपणाऱ्या या सरकारच्या कारभारात संगणक परिचालकांचे मोलाचे योगदान आहे. जे संगणक परिचालक सत्तेवर बसवु शकतात तेच तुम्हाला सत्तेतुन खाली खेचु शकतात, असा कडक इशारा धनंजय मुंडे यांनी दिला. तसेच या आनंदोलनाला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगून जो पर्यंत संगणक परीचालकांना न्याय मिळणार नाही तो पर्यत आपणही गप्प बसणार नाही तर संपूर्ण ताकद संगणक परीचालकांसाठी पणाला लावू असे अभिवचन संगणक परीचालकांना दिले.
यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रकाश गजभिये, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.
यानंतर आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चा, महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटना, अखिल नंदीवाले समाज संघ, राजापूर रिफायनरी बाबत आंदोलन करणारे भारतीय पर्यावरण चळवळ, महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समिती, नैसर्गिक विना अनुदानित वाढीव वर्ग / तुकडी शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र राज्य अघोषित शिक्षक समिती, ए.आय.टी.यु.सी. (लालबावटा), विविध ग्रामपंयातीच्या मागण्या करणारे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. निर्देशक संघटना, महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समिती, बिगर आदिवासी हक्क बचाव समिती आदी विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या संस्थांच्या / संघटनांच्या प्रतिनिधींना धनंजय मुंडेंनी भेट दिली.
दरम्यान पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्याने पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाला धनंजय मुंडे यांनी भेट दिली, तसेच याबाबत सरकारने त्वरित लक्ष घालावे यासाठी आपण प्रयत्न करू याची ग्वाही उपस्थित पत्रकारांना दिली.

Post a Comment