( संजय खांबेटे : प्रतिनिधी, म्हसळा )
शासनाच्या ध्येय धोरणा नुसार असणाऱ्या तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या सभेचे गुरवार दिं .२९ नोव्हे . रोजी सकाळी ११ वा. म्हसळा सार्वजनिक वाचनालयाचे हॉल मध्ये आयोजन करण्यात आले आहे. सदरचे समितीचे गठन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यानी नुकतेच केले आहे . तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी म्हसळा तालुका भाजपाचे अध्यक्ष शैलेश कुमार दिनेशचंद्र पटेल यांची नियुक्ती व सदस्यपदी, तुकाराम पाटील , रेवली, नंदकुमार सावंत म्हसळा, महेश पाटील, मेंदडी, मंगेश म्हशीलकर, म्हसळा, श्रीमती कल्पना कोठावळे, रेवली, धनश्री मुंडे पाष्टी, हे अन्य सदस्य समितीत आहेत.
तालुक्यात पंचायत समिती, नगरपंचायत, शिक्षण व जि. प. आरोग्य विभाग, ग्रामिण रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग,भूमी अभिलेख, वनविभाग, सामाजिक वनीकरण , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ (MSRDC), BSNL, सेतू (आपले सरकार सेवा केंद्र ) या सर्वच कार्यालयांमध्ये प्रचंड दप्तर दिरंगाई, जनतेची पिळवणूक होत असताना तालुक्यात समन्वय साधण्यात नव्याने स्थापन झालेल्या व विशेष अनुभव नसणाऱ्या कमेटीला विशेष आभ्यास करावा लागणार आहे.
तालुक्यातील म्हसळा नगर पंचायत, बहुतांश ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद , आमदार अशी असणारी राजकीय सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळे त्यांचे समोर काम करताना भाजपाचे या टीमला कितपत जमेचे व आभ्यासू राजकारण करता येते ह्याची सुद्धा कसोटी लागणार आहे. उद्या होणारी ही सभा तब्बल ४ वर्ष ३ महीन्याने होत असल्याने अनेक अधिकारी कर्मचारी सर्तक आहेत.
या वर्षी तालुक्यातील पाणी टंचाईत वाढ होण्याचा संभव आहे. त्यामुळे पाटबंधारे, ग्रा पा. पु. विभागाकडे कमेटीचे विशेष लक्ष रहाणार आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात खारभूमी क्षेत्र आहे. या विभागातील अधिकारी तालुक्याच्या समस्या कशा सोडविणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment