ऑनलाईन आरक्षणातून गावांची नावे वगळली : एस .टी.आरक्षण केल्यास बसण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे

आता एस .टी.आरक्षण केल्यास बसण्यासाठी तालुक्याच्याच ठिकाणी जाण्याचे महामंडळाचे प्रवाशांना आदेश -ऑनलाईन आरक्षणातून गावांची नावे वगळली, महामंडळाकडून खाजगी वाहतूकीला उघड उघड प्रोत्साहन प्रवासी प्रतिनिधी अनिल महामुणकर   यांचा आरोप

म्हसळा : सुशील यादव 
"हात दाखवा, एसटी थांबवा ", प्रवाशांच्या सेवेसाठी ,जनतेची लाल परी अशी अनेक ब्रीदवाक्ये घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना प्रवासाची हमी देत सेवा सुरु केली . प्रवाशांकडूनही याला प्रतिसाद मिळत गेल्याने महामंडळही आर्थिक भरभराटीस आले . मात्र गेल्या काही दिवसांपासून महामंडळाने पठाणी कायदा करीत एसटीचे आरक्षण केल्यास बसण्याचे ठिकाण हे तालुक्याचे ठेऊन प्रवाशांना त्रासात टाकले आहे व खाजगी वाहतूकीला कसे प्रोत्साहन मिळेल याकडे जाणीव पूर्वक लक्ष दिले आहे . मात्र एसटीचा हा तुघलघी नियम आम्हाला मान्य नसून या अन्यायाला विरोध म्हणून येत्या आठ दिवसात प्रत्येक एसटी आगारासमोर ठिय्या आंदोलन करणेत येईल असा गर्भीत इशारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल महामूणकर यांनी मुख्य महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना पाठवीलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे . त्यांनी पूढे म्हटले आहे की  एखादया प्रवाशाला आपले इच्छित स्थळी जाण्यासाठी आगाऊ आरक्षण करण्याचा नियम एसटीचा आहे .व बसण्याचे ठिकाण हे त्या प्रवाशाच्या गावचे एस.टी.थांब्यावर असे . त्यामूळे प्रवाशाला ते सोयीचे होत असे मात्र मागील काही दिवसांपूर्वी महामंडळ ने खाजगी वाहतूकीला उत्तेजन देत आरक्षण केल्यास बसण्यासाठी तालुक्याचे ठिकाण निश्चित केले आहे व हा प्रवाशांवर एक प्रकारे अन्यायच केला आहे . असे करण्यामागे महामंडळाचा नेमका हेतू कोणता ?यातून महामंडळाला काय साध्य करावयाचे आहे ?व असा निर्णय घेऊन महामंडळ आपले उत्पन्न ' किती पटीने वाढविणार आहे ?या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच आहेत . आता खाजगी वाहतूकदार  प्रवाशांची ने - आण करण्यासाठी गावो- गावी जात असतात त्यामूळे प्रवासीही आनंदाने या खाजगी वाहतूकदारांना मागेल ते भाडे देत असतातं . मात्र अशा परिस्थितीतही काही प्रवासी हे एसटी वर विश्वास दाखवून प्रवास करीत आहेत .परंतू आता हे उरलेसुरले प्रवासी महामंडळाला नकोसे झाले असून आरक्षणाच्या बाबत हा मनमानी निर्णय घेतला आहे . मात्र या निर्णयाला आम्ही बळी पडणार नसून हा निर्णय मागे घेऊन पूर्वी प्रमाणे आरक्षणाची सोय न केल्यास आम्ही प्रत्येक आगारासमोर ठिय्या आंदोलन करू असा ईशारा देत लवकरच याबाबत नामदार दिवाकर रावते  यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महामंडळाच्या या नियमांना लगाम घालणार असल्याचे  अनिल महामुणकर यांनी शेवटी सांगितले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा