म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील खेडोपाड्यातील गावागावात मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे आहेत काही शेतकरी वर्ग तर या पाळीव प्राण्यांच्या जीवावर आपला उदरनिर्वाह चालवीत असून अनेकांच्या कुटुंबाचे आर्थिक सहाय्य म्हणून जनावरांचे मोठे आधार आहे परंतु अलीकडे काही दिवसांपासून गाई , म्हैस , बैल , शेळ्या या पाळीव प्राण्यांना विविध प्रकारच्या आजाराने ग्रासले असून अचानक गुरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे येथील शेतकरी वर्ग चिंतेत आहे . तर दुसरीकडे स्थानिक पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली पशुसंवर्धन विभागामार्फत पाळीव जनावरांचे आजार व त्यावर उपचार देखभाल केली जाते त्या म्हसळा पशुसंवर्धन विभागात कायम स्वरूपी डॉक्टर व कर्मचारी वर्ग नसल्याने पंचायत समिती मधे अपुऱ्या कर्मचारी वर्गाची बोंबाबोंब सुरु असून स्थानिक प्रशासनाचे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे का असा सवाल नागरिक करीत आहेत . तालुक्यातील सकलप , नेवरूळ , घुम रुद्रवट कोकबल , ठाकरोली , सांगवड परिसरातील बहुतांश गुरांना विविध आजारांची लागण झालेली आहे या आजारात गुरांच्या पायाच्या तळभागातून रक्त बाहेर येते काही गुरे तोंडातून सफेद लाळ गळते . अनेक धडधाकट गुरांची मागील काही दिवसांपासून प्रकृती खालावलेली पहायला मिळते तर गुरांना गोठ्यातून बाहेर सोडली असता ही गुरे पुन्हा गोठ्यात येऊन बसतात यावरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर नेवरूळ , वाडांबा फाटा , सकलप ते म्हसळा या मार्गावर अनेक गुरे झाडाझुडपांच्या आश्रयाला सावलीखाली बसलेली असतात या गुरांच्या देखील पायातून रक्त वाहत असताना दिसते तर काही गुरे पाय आपटत आपटत चालताना दिसतात .
म्हसळा तालुक्यातील काही गावात गुरांना ज्या आजाराची लागण झाली आहे ते आजार व्हायरल आहे शेतकऱ्यांनी आपल्या गुरांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे . मागील काही दिवसांत घुम , नेवरूळ , सकलप , काळसुरी , खरसई, वारळ , बनोटी , आगरवाडा , सुरई , खारगाव बुद्रुक , चिचोंडे , केलटे , घोणसे या गावात मेंदडी दवाखाना व म्हसळा दवाखाना अंतर्गत २००० पेक्षा जास्त गुरांना लसीकरण करण्यात आले आहे उर्वरित गावातील गुरांना लसीकरण सुरू असून शेतकरी वर्गाने देखील आपल्या गुरांची देखभाल व्यवस्थित ठेवली पाहिजे , गुरांचा गोठा स्वच्छ ठेवला पाहिजे . तसेच कार्यालयात कर्मचारी वर्गाची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे .
- डॉ . एस . के . थोरात, पशुधन विकास अधिकारी

Post a Comment