तहसिलदार दालनात पार पडलेल्या सभेमध्ये अधिकाऱ्याना जाब विचारताना डॉ . मोईज शेख
म्हसळा शहरात माणगाव – दिघी रस्ता रुंदीकरणाचे काम शहरवासीयांनी रोखले, जागेचा मोबदला व रस्त्याच्या उंचीवरून कंत्राटदार, अधिकाऱ्यांना धरले धारेवर. तहसीलदारांची मध्यस्ती : सर्व कागदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच काम होणार सुरु
म्हसळा : सुशील यादव
म्हसळा शहरात माणगाव ते दिघी काँक्रीटीकरणाचे काम शहरवासीयांनी गुरुवारी(दि.२५ ) रोखले. यावेळी कंत्राटदार व ग्रामस्थ यांच्यात रस्त्याची उंची व जागेचा मोबदला या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. परंतु म्हसळा तहसीलदारांच्या मध्यस्थीने काल(दि. २६ ) याबाबत चर्चा होऊन जोपर्यंत या संदर्भातील कागदी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत काम थांबवीण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर या चर्चेला काही दिवसांपुरता विराम मिळाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की माणगाव ते दिघी या ५८ की.मी . रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण गेल्या एक वर्षापासून सुरु आहे . गेल्या दोन दिवसापासून हे काम म्हसळा पोलीस चेक पोस्ट पासून पुढे म्हसळा शहाराकडे येऊ लागले आहे. यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन ठिकाणी मोरीचे काम रात्रंदिवस अगदी वेगाने सुरु होऊन पूर्ण देखील झाले. हे काम करताना ज्यांच्या जागेत हे काम केले गेले याना लेखी सोडाच पण साडी तोंडी कल्पनादेखील दिली गेली नाही. तसेच या ठिकाणी टाकलेल्या मोरीमुळे या रस्त्याची उंची फार जास्त होऊन बाजूच्या जागा जवळ जवळ ६ फुट खोल जाणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या कारणावरून चिडलेल्या नागरिकांनी या कामाठीकाणी धाव घेऊन काम बंद करण्यास भाग पाडले. यावेळी म्हसळा तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके व म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे हजर होते. ग्रामस्थांचा चढलेला पारा पाहून संबधित कंत्राटदार समोर यायला तयार नव्हता. परंतु तहसीलदारांच्या सांगण्यावरून हा कंत्राटदार कादिरी पेट्रोलपंपाच्या समोर सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी हजर झाला. मग मात्र ग्रामस्थांनी सदर कंत्राटदाराला चांगलेच फैलावर घेतले. या सर्व वादाचे रुपांतर कायदा व सुव्यवस्था बिघडण्यात होऊ लागल्याचे लक्षात येताच तहसीलदार झळके यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता यांच्याशी ग्रामस्थांचा व बाधित शेतकऱ्यांचा संवाद घडवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर वाद तात्पुरता निवळला. तद्नंतर काल(दि.२६) रोजी तहसीलदार दालनात दुपारी ३.३० वा पार पडलेल्या सभेमध्ये सर्वच ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप अभियंता सचिन निफाडे याना रस्त्याची उंची व जमिनीचा मोबदला या प्रश्नावरून चांगलेच धारेवर धरले. या प्रश्नांची उत्तरे देताना सचिन निफाडे यांनी रस्त्या च्या कामासंदर्भात माहिती देण्यास सुरुवात केली व यातच काबुल देखील केले की अजून मोजणी प्रक्रिया तसेच हद्द कायम करण्यात आलेली नाही त्यामुळे अजून या रस्त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. हे उत्तर ऐकून ग्रामस्थ संतापले व जोपर्यंत हि सर्व कागदी प्रक्रिया तसेच या रस्त्याची उंची योग्य प्रमाणात करण्याचे लेखी स्वरूपात पुरावे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून मिळत नाही तोपर्यंत म्हसळा शहरातील या रस्त्याचे काम बंदच राहिले पाहिजे असा आक्रमक पवित्रा घेतला. बराच काळ चाललेल्या या चर्चेनंतर तहसीलदार रामदास झळके यांनी देखील यासंदर्भात बोलताना सांगितले की हि सर्व कागदी प्रक्रिया काही दिवसात पूर्ण केल्यानंतरच सदरचे काम सुरु होईल. यावेळी नायब तहसीलदार के.टी.भिंगारे, हिंदू समाज अध्यक्ष सुभाष करडे, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष डॉ. मोईज शेख , फजल हळदे, नसीर मिठागरे, योगेश करडे, समीर करडे, सलीम चोगले , निकेश कोकचा , बाबू शिर्के, निलेश मांदाडकर यांच्यासहित अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
अजूनही जागा मोजणीचे तसेच हद्द कायम करण्याचे काम झालेले नाही. हे काम येत्या काही दिवसात पूर्ण करू तसेच रस्त्याच्या उंची संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून प्लान मध्यी योग्य तो बदल करून पर्याय काढण्याचा प्रयत्न करू.
- सचिन निफाडे , उप अभियंता , महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ
सदर रस्त्यालगतची जागा मोजणी वेगाने होण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालणार तसेच रस्ता रुंदीकरणामुळे बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासंदर्भात श्रीवर्धनचे उप विभागीय अधिकारी प्रवीण पवार यांचे मार्गदर्शन घेणार आहे.


Post a Comment