म्हसळा : सुशील यादव
म्हसळा शहरात प्लास्टिक बंदीच्या कारवाई वरून अधिकारी-व्यापाऱ्या मध्ये धुमश्चक्री उडाल्याचे चित्र काल(२३ ऑक्टो) पहावयास मिळाले व याचे पर्यवसन रास्ता रोको व दुकाने बंद करण्यामध्ये झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की म्हसळा शहरात प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी करताना मुख्याधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी म्हसळा बाजारपेठेतील दुकानांवर अचानक धाड टाकून दंडात्मक कार्यवाही करण्यास मंगळवारी सकाळी म्हणजेच ऐन बाजाराच्या दिवशी सुरुवात केली. परंतु काही दुकानांवर रुपये पाच हजारांची दंडात्मक कारवाई करताच सर्वच व्यापारी संतप्त झाले व आपापली दुकाने बंद करून मुख्य रस्त्यावर आले व शेकडो व्यापाऱ्यांचा तसेच नागरिकांचा जमाव जमल्याने आपोआपच शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता बंद झाला. या सर्व परीस्थितीत म्हसळा शहरात बाजार पेठेतील मुख्य रस्त्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता यावेळी पोलिसांनी व्यापाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु जोवर हि दंडात्मक कार्यवाही परत घेत नाही तो पर्यंत दुकाने उघडणार नाही असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला मग काही वेळाने पोलिसांच्या मध्यस्तीने अधिकारी व व्यापारी यांच्यात चर्चा होऊन समाधानकारक मार्ग निघाल्याने हा वाद निवळला. ही कारवाई करताना म्हसळा नगरपंचायतचे मुख्याधीकारी वैभव गारवे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महाड चे उप प्रादेशीक अधिकारी सागर औटी , क्षेत्र अधिकारी जयदीप कुंभार, पोलीस उप निरिक्षक दिपक ढुस यांच्या सहीत पोलीस कर्मचारी , नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते . या सर्व प्रकाराची माहीती मिळताच काही वेळातच श्रीवर्धन डी .वाय.एस्.पी. बी.एन्. पवार हे घटनास्थळी हजर झाले होते .
विशेष म्हणजे या प्लास्टिक बंदी कार्यवाहीत शिवसेना नगरसेविका संपदा पोतदार यांच्या पतीचे सोन्या-चांदीचे दुकानावर सुद्धा(रु. ५००० ) दंडात्मक कारवाई झाली.
आम्हा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याआधी या प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई का करत नाही ?
-गौरव पोतदार , सोने चांदीचे व्यापारी
जर तुम्हा व्यापाऱ्याना या प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा पत्ता माहीत असेल तर तो आम्हाला द्यावा आम्ही लगेच कारवाई करू. तसेच प्लास्टिक बंदी बाबतीत आपले जे काही म्हणणे असेल ते लेखी निवेदनाद्वारे शासनाला सांगावे. आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावीत आहोत.
-सागर औटी , उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ, महाड
कारवाई करण्यापूर्वी व्यापाऱ्यांना पूर्वसूचना देणे गरजेचे होते. व्यापारी चोर आहेत का? मग हि हिटलरशाही प्रमाणे कार्यवाही का ? हि कार्यवाही त्वरित मागे घ्यावी.
-अली कौचाली , राष्ट्रवादी नेते , म्हसळा
आम्ही फक्त शासनाच्या आदेशाची व शासनाने दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करीत आहोत. प्लास्टिक बंदी ची पुरेशी जनजागृती केली आहे त्यानंतरच कारवाईला सुरुवात केली आहे.
-वैभव गारवे, मुख्याधिकारी , नगरपंचायत , म्हसळा
जी दंडात्मक कारवाई केली गेली आहे ती नगरपंचायत ची सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेऊन मागे घेतली जाईल परंतु यापुढे व्यापारी व नागरिकांनी प्लास्टिक बंदी साठी सहकार्य करावे.
-फलकनाझ हुर्झुक , नगराध्यक्षा , नगरपंचायत , म्हसळा .

Post a Comment