म्हसळा : वार्ताहर
म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत घुम-रुद्रवट हद्दीत महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत तालुका कृषीअधिकारी कार्यालय म्हसळा यांच्या देखरेखीखाली मौजे घुम (घुमेश्वर) या गावातील नदीला बांधण्यात आलेले 25 लाखांचे बंधारे निकृष्ट दर्जाचे काम केलेले असल्यामुळे अवघ्या तीन-चार वर्षातच वाहून गेल्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली असून ही घटना काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती ही बातमी ताजी असतानाच आता नव्याने एक माहिती समोर येत आहे ती म्हणजे ग्रामपंचायत घुम-रुद्रवट हद्दीतील घुम व रुद्रवट या गावात सन 2005 ते सन 2015 या कालावधीत शासनाच्या विविध योजना, पंचायत समिती सेस फंड, रायगड जिल्हा परिषद फंड, स्थानिक आमदार विकास निधी, स्थानिक तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास निधी, जिल्हा वार्षिक नियोजन विकास निधी, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत प्राप्त निधी, 13 वा वित्त आयोग प्राप्त निधी, ग्रामपंचायतिला प्राप्त पुरस्कार निधी, त्याचबरोबर ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असल्याने व येथील जनतेचा पुर्णपणे राष्ट्रवादी पक्षाला बिनविरोध पाठिंबा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या मार्फत मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांना एकूण प्राप्त झालेला निधी व यातून प्रत्यक्षात झालेल्या विकासकामांवर केलेल्या खर्चाची व सद्यस्थितीतील कामांची परिस्थितीची सविस्तर चौकशी करण्याची मागणी घुम गावचे सुपुत्र, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट शाखा म्हसळा व यादव उन्नती संस्था गवळी समाज म्हसळा तालुका सेक्रेटरी तथा युवा सामाजिक कार्यकर्ते कु.श्रीकांत बिरवाडकर यांनी म्हसळा तहसीलदार श्री.रामदास झळके यांच्यामार्फत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग व पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.वाय.एम.प्रभे यांच्याकडे दि.19 ऑक्टोबर 2018 रोजी लेखी निवेदन देऊन सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत घुम-रुद्रवट हद्दीत सन 2005 ते 2015 या कालावधीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माजी मंत्री सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नाने करोडो रुपयांची विकास कामे झालेली आहेत परंतु झालेली विकासकामे ठेकेदारांची पोट भरण्यासाठी झाली की नागरिकांच्या फायद्यासाठी झाली हा भला मोठा प्रश्न निर्माण झाला असून कित्येक कामे आज तागायत अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत आहेत. तसेच पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद यांच्याकडून ग्रामपंचायतीला विकासकामे करण्यासाठी प्राप्त झालेल्या विकास निधीतून करण्यात आलेली विकासकामे बोगस व निकृष्ट दर्जाची केलेली असून शासनाच्या निधीचा गैरवापर करून अनेक आर्थिक गैरव्यवहार करून तत्कालीन माजी सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून पदाचा गैरवापर केलेला आहे. तसेच ग्रामपंचायतीचे तत्कालीन माजी सरपंच व माजी उपसभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य मधुकर गायकर व ग्रामसेवक गुरुनाथ विरकुड यांनी काही ठिकाणी प्रत्यक्षात नवीन काम न करताच जुने काम दाखवून कामाच्या मागणीचे ठराव व काम पूर्ण होऊन देखभाल दुरुस्तीचे दाखले दिलेले आहेत. त्याचबरोबर कित्येक झालेल्या विकासकामांचे उदघाटने देखील केलेली नसून महत्त्वाचे म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून व माजी मंत्री सुनिल तटकरे यांच्या कृपाशीर्वादाने विविध खात्यातून मंजूर करून आणलेला विकास निधी तसेच राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या फंडातून प्राप्त झालेल्या विकास निधीतून करण्यात आलेल्या कामांचे नामफलक किंवा बोर्ड देखील लावण्यात आलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून जिल्हा परिषद फंडातून घुम-रुद्रवट गावात अंतर्गत सिमेंट काँक्रीटीकरण रस्ते, स्मशान भूमीकडे जाणारे रस्ते, बौद्धवाडी वस्तीतील रस्ते असे विविध रस्ते करण्यात आलेले आहेत परंतु ही कामे कोणत्या राजकीय पक्षाकडून किंवा कोणत्या लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नाने करण्यात आली आहेत तसेच कामाचा ठेकेदार कोण, कामासाठी निधी मंजूर किती झाला होता व प्रत्यक्षात कामावर निधी खर्च किती झाला, काम कोणत्या योजनेतून झाले तसेच झालेली विकास कामे कोणत्या राजकीय पक्षाकडून किंवा कोणत्या लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नाने करण्यात आली आहेत या सर्व बाबींचा काहीच थांगपत्ता येथील जनतेला लागत नाही त्यामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये मंजूर करून आणलेले गेले कोठे व हा निधी नक्की कोणासाठी आणलेला ठेकेदारांचे खिशे भरण्यासाठी की गावाचा पायाभूत विकास करण्यासाठी आणलेला होता हा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला असून घुम–रुद्रवट ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आलेली करोडो रुपयांची विकासकामे बोगस व निकृष्ट दर्जाची करून प्राप्त झालेल्या निधिचा ठेकेदार व संबंधितांनी मोठया प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक करणार्यांवर वरदहस्त कोणाचा आहे हा चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे घुम-रुद्रवट ग्रामपंचायत हद्दीत सन 2005 ते 2015 या कलावधीत झालेल्या विकास कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी श्रीकांत बिरवाडकर यांनी म्हसळा तहसीलदार श्री.रामदास झळके यांच्यामार्फत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग व पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.वाय.एम.प्रभे यांच्याकडे दि.19 ऑक्टोबर 2018 रोजी लेखी निवेदन देऊन सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच घुम-रुद्रवट ग्रामपंचायतीच्या हद्दीत सन 2005 ते 2015 या कालावधीत झालेल्या विकास कामांची चौकशी म्हसळा तालुक्यात येणार्या पंचायत राज कमिटी मार्फत करण्यात यावी अशीही मागणी श्रीकांत बिरवाडकर यांनी कामिटीचे अध्यक्ष व सदस्य यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment