प्रतिनिधी : बोर्लीपंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी खुर्द भागामध्ये २०० घरांसाठी चांगल्या दाबाने वीजपुरवठा होण्याच्या उद्देशाने वीज वितरणाकडून नवीन ट्रान्सफॉर्मर ३ महिन्यांपूर्वी बसविण्यात आला असून अद्याप कार्यान्वीत न झाल्याने वितरणाच्या कार्यव्यवस्थेवर ग्रामस्थान नाराजी व्यक्त केली . यामुळे गणेशोत्सवामध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांनी प्रचंड चीड व्यक्त केली . तर लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर सुरू करून ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.
वाळवटीगावासाठी याआधी२ ट्रान्सफॉर्मर कार्यान्वीत आहेत . परंतु , गावाच्या शेवटच्या टोकाला असलेले वाळवटी दांडा ( खुर्द ) येथील सुमारे २०० घरांना नेहमीच खूपच कमी दाबाने वीज पुरवठा होत आला असल्याने सिंगल फेजची पाण्याची मशीनदेखील चालणे मोठे जिकिरीचे काम होते . येथील ग्रामस्थांनी वीज वितरण श्रीवर्धनकडे पाठपुरावा करून येथे नवीन ट्रान्सफॉर्मर वितरणाकडून ३ महिन्यांपूर्वी बसविण्यात आला . परंतु , ट्रान्सफॉर्मर बसूनही त्याची विद्युत जोडणी न झाल्याने व पर्यायाने टन्सफार्मर कार्यान्वीत न झाल्याने या भागामध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे ऐन गणेशोत्सवामध्ये ग्रामस्थांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे . ग्रामस्थांनी श्रीवर्धन वीज वितरण कार्यालयाकडे अनेकदा संपर्क साधून सदर ट्रान्सफार्मर लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करूनही त्यांना श्रीवर्धन वितरण कार्यालयाकडून कोणतीही ठोस भूमिका न झाल्याने महालक्ष्मी दांडा मंडळाचे अध्यक्ष किरण आंबेकर यांनी वितरण कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली . तर पुढील १५ दिवसांत वीज वितरणाने तीन महिन्यांपासून शोभेसाठी बसविलेले ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर सुरू केले नाही , तर आम्ही ग्रामस्थ उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा किरण आंबेकर यांनी दिला. खरे तर वाळवटी खु . येथे बसविण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर हे दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून बसविण्यात आले असून ग्रामीण भागामध्ये विद्युत वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या योजनेस वाळवटीमध्ये ३ महिन्यानंतरही ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यात वितरणास का विलंब होत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे .
वाळवटी येथील ट्रान्सफॉर्मर आम्ही बसविले असून याचे ठेकेदार गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा . लि . या कंपनीने या ट्रान्सफॉर्मरची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेकडून तपासणी करून परवानगी घेणे आवश्यक असल्याने तेथून परवानगी घेण्याचे काम संबंधित कंपनीचे आहे , ते प्रलंबित असल्याने ट्रान्सफॉर्मर चार्ज करून सुरू करता येणार नाही.
- महेंद्र वाकपैंजण , उपकार्यकारी अभियंता , श्रीवर्धन

Post a Comment