श्रीवर्धन : संतोष चौकर
पावसाळा सुरु झाल्यापासून श्रीवर्धन तालुक्यात मुसळधार पाऊस झाला . अगदी नारळीपौर्णिमा होई पर्यंत समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला होता . त्यामुळे पाऊस सुध्दा सातत्याने पडत होता . मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात पसवण्याच्या वेळेलाच पाऊस गायब झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे . जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाल्यापासून श्रीवर्धन तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती . अनेक शेतकर्यांनी भातपेरणी सुध्दा वेळेवर करुन ठेवल्यामुळे भाताचे आवण लवकर तयार झाले पाऊस नियमितपणे पडत असल्यामुळे शेतकर्यांच्या भातलावण्या देखिल वेळेत पार पडल्या . शेतामध्ये पाणी असल्यामुळे शेतकयांना खते वेळेवर देता आली . नारळीपौर्णिमा झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे उन्हाळ्यात जसे कडकडीत उन पडते तसे उन पडत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन भातशेती मधील पाणी आटत चालले आहे . गणपतीचा सण झाल्यानंतर पितृपक्ष सुरु होतो , याच दरम्यान भातशेती पसवते म्हणजे कोवळे भाताचे दाणे रोषांवर तयार होऊ लागतात . भात पसवण्याच्या वेळेला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणे आवश्यक असते पाऊस नसल्यामुळे बळीराजा चिंतातुर झाल्याचे पहायला मिळत आहे येत्या आठवडा भरात पावसाचे पुनरागमन न झाल्यास चांगले आलेले भातपिक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे उन्हाळ्यातील पाणी साठ्याच्या दृष्टीने किमान पंधरा दिवस चांगला पाऊस होणे गरजेचे आहे

Post a Comment