म्हसळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये ५ पैकी २ राष्ट्रवादी तर १ काँग्रेस-शिवसेना आघाडी व २ ग्रामपंचायत विकास आघाडीच्या ताब्यात..


आंबेत मध्ये काँग्रेसची बॅ . अंतुलेंना आदरांजली तर खारगाव खुर्द मध्ये "पाटीलकी गेली खोती आली"
म्हसळा : सुशील यादव 
म्हसळा तालुक्यात बुधवारी(दि. २६) पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये ५ पैकी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्या तर १ काँग्रेस-शिवसेना आघाडी व २ ग्रामपंचायत विकास आघाडीला जिंकता आल्या. याबाबत सविस्तर वृत्त असे की म्हसळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पक्ष निहाय समिश्र लागला असला तरी गेल्या २४ वर्षापासून खारगाव खुर्द ग्रामपंचायतीवरील  शिवसेनेचे वर्चस्व धुळीस मिळवत वनिता शेखर खोत यांनी निव्वळ एका मतांनी विजय मिळवून हि ग्रामपंचायत राष्ट्रवादीला मिळवून देत म्हसळा पंचायत समितीचे  माजी सभापती महादेव पाटील यांच्या उमेदवारास पराभूत केल्याने '' पाटीलकी गेली खोती आली " अशी चर्चा खारगाव खु . मध्ये रंगली . खारगाव खुर्दमध्ये शिवसेनेच्या चार तर राष्ट्रवादीच्या  तीन असे पक्षीय संख्याबळ  असून यामध्ये महादेव पाटील यांच्यासाठी समाधानााची बाब म्हणजे त्यांचे सुपुत्र अ‍ॅड मुकेश पाटील हे सेनेकडून विजयी  झाले आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए.आर. अंतुले यांच्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक देखील चुरशीची झाली व यामध्ये काँग्रेस – शिवसेना युतीच्या डावरे अफरोजा नाझीम यांनी राष्ट्रवादीच्या सुवर्णा प्रकाश म्हाप्रळकर यांचा पराभव करून राष्ट्रवादीची १५ वर्षाची सत्ता नामशेष केली. यावेळी  स्व. बॅ. ए.आर. अंतुले यांचे सुपुत्र नवीद अंतुले,  कुटुंबीय तसेच कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ.मुईज शेख, काँग्रेस  कार्यकर्ते , ग्रामस्थ तसेच शिवसेनेची असणारी युती या सर्वांनी एक दिलाने काम केल्याने आंबेत मधील सत्ता आज कॉंग्रेसला सहजरित्या प्राप्त करता आली. बॅ अंतुले यांनी लावलेले काँग्रेस चे  रोपटे आज जगवण्याचे काम तेथील निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्ते आजही  प्रामाणिकपणे करत आहेत हे या विजयावरून दिसून आले. “ आंबेत मधील झालेला विजय हा आमचा नसून माजी मुख्यमंत्री बॅ अंतुले साहेबांचा आहे आणि तो आम्ही त्यांना समर्पित करीत आहोत” अशा  शब्दांत कॉंग्रेस तालुका अध्यक्ष डॉ.मुईज शेख यांनी स्व. बॅ. ए.आर. अंतुले  याना आदरांजली वाहिली. त्याचबरोबर मांदाटणे ग्रामपंचायतीमध्ये ग्राम विकास आघाडीचे चंद्रकांत पवार हे बिनविरोध सरपंच विराजमान झाले असले तरी उर्वरित जागेवर लागलेली निवडणूक चुरशीची होऊन त्याठिकाणी शिवसेनेचा धुव्वा उडवीत ग्राम विकास आघाडीने विजय संपादित केला. तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या मेंदडी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा  शिवसेनेने राष्ट्रवादीकडून सपाटून मार खाल्याचे दिसून आले. १ सदस्य वगळता इतर सर्व जागेवर राष्ट्रवादी ने विजय मिळवित आपला गड शाबूत ठेवला आहे. तालुक्यातील आणखी एक चुरशीची लढत झालेल्या  कोळे ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या जाधव देवका गणेश यांनी पंचक्रोशी विकास आघाडीच्या पवार शेवती सीताराम यांचा ६२ मतांनी पराभव करीत विजय संपादित केला. तर सदस्यांमध्ये माजी सभापती करुणाताई काप यांचे पती दिनेश काप विरुद्ध मावळते  सरपंच अमोल पेंढारी यांच्यात चुरशीची लढत होऊन मामा भाचे मध्ये मामा दिनेश काप पराजय तर भाचा अमोल पेंढारी  विजयी झाले तर उर्वरित सदस्यापैकी दोन सदस्य वगळता परिवर्तन विकास आघाडीचा विजय झाला आहे. 

म्हसळा तालुका ५ ग्रामपंचायत निकाल 

१ .ग्रामपंचायत कोळे येथे सरपंच पदासाठी जाधव देवका गणेश(कोळे परिवर्तन विकास आघाडी) (मिळालेली मते ३६७) विजयी विरुद्ध पवार शेवंती सीताराम( मिळालेली मते ३०५)
२ . ग्रामपंचायत खारगाव खुर्द येथे सरपंच पदासाठी वनिता चंद्रशेखर खोत, राष्ट्रवादी  (मिळालेली मते ३५९) विजयी विरुद्ध मीरा कृष्णा म्हात्रे, शिवसेना (मिळालेली मते ३५८)

३ .ग्रामपंचायत आंबेत येथे सरपंच पदासाठी अफरोजा नाझीम डावरे, काँग्रेस (मिळालेली मते ६९८) विजयी विरुद्ध सुवर्णा प्रकाश म्हाप्रळकर, राष्ट्रवादी (मिळालेली मते ५५४) 

४ . ग्रामपंचायत मेंदडी येथे सरपंच पदासाठी राजश्री रवींद्र कांबळे, राष्ट्रवादी (मिळालेली मते ९९६  ) विजयी विरुद्ध निर्मला श्याम कांबळे , शिवसेना (मिळालेली मते ८०२  )          
    
तर 
५ . मांदाटणे ग्रामपंचायत मध्ये ग्राम विकास आघाडीचे चंद्रकांत पवार  हे याआधीच बिनविरोध सरपंच म्हणून निवडणून आले आहेत 
 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा