टीव्ही, फ्रिजसह 19 ऐशोआरामाच्या वस्तू महागणार; सीमा शुल्कात वाढ.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 

आधीच पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य पिचून गेला असताना केंद्र सरकारने टीव्ही, फ्रिजसह 19 ऐश -आरामाच्या वस्तूंवरील सीमा शुल्कात वाढ केली आहे. यामुळे परदेशातून भारतात आयात होणाऱ्या या वस्तू आणखी महाग होणार आहेत. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमालीचा घसरला आहे. यामुळे चालू खात्यामधील तोट्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार काही गरजेच्या नसलेल्या वस्तूंवर सीमा शुल्क वाढवून त्यांची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. यानुसार केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. काल बुधवार दि. २६ संप्टेबरच्या मध्यरात्रीपासून हे शुल्क लागू होणार आहे. 
केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहे. यामुळे आज मध्यरात्रीपासून या 19 वस्तूंसाठी जादा शुल्क मोजावे लागणार आहे. गरजेच्या नसलेल्या वस्तूंची मागणी कमी होईल आणि मेक इन इंडियाला प्राधान्य मिळेल. या निर्णयाचा तोटा प्रामुख्याने चीनला होणार आहे. कारण चीनमधून सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात आयात केल्या जातात. आर्थिक वर्षात 2017-18 मध्ये जवळपास 86 हजार कोटी रुपयांच्या वस्तू भारतात आयात करण्यात आल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा