ग्रामपंचायत चा वर्षाला लाखो रुपयांचा स्थानिक निधी जमा
श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
महाराष्ट्रातील नावाजलेले तीर्थक्षेत्र व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू असलेले हरिहरेश्वर विकासाच्या प्रतीक्षेत आहे. पांडव प्रदक्षिणा मार्ग दुरुस्ती अगत्याची आहे .प्रत्येक पावसाळ्यात जून ते नोव्हेंबर या कालावधीत प्रदक्षिणा मार्ग बंद केला जातो. आजमितीस मार्गाचा दुतर्फा असलेल्या संरक्षक लोखंडी आधारक (कठडे )पुर्णतः तुटल्याचे निदर्शनांस येत आहेत.परिणामी भविष्यात धोकादायक घटना घडण्याची चिन्ह दिसत आहेत .त्यामुळे सदर मार्गा विषयी हरिहरेश्वर देवस्थान ट्रस्ट ,व ग्रामपंचायत यांनी सकारात्मक भूमिका बजावणे आवश्यक आहे.
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे मंदिर आहे. हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्त्वाची आहेत. यामुळे श्रावणात येथे मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी असते. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्र तीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे येथे आहेत.
हरिहरेश्वराचे मंदिर प्राचीन पांडव कालीनअसावे असा अंदाज आहे. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार सन १७२३ मध्ये केल्याचे समजते . डोंगराच्या कुशीत हरिहरेश्वर हे तीर्थस्थान आहे. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत, त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील सुमारे दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर सुमारे सव्वा किमी आहे . पायऱ्या उतरून खाली गेल्यास प्रदक्षिणा मार्गा वर पावसा मुळे सर्वत्र शैवाल निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. श्रावणी सोमवारी हरिहरेश्वर ला भाविकांची मोठी गर्दी असते.महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक व पर्यटक हरिहरेश्वर ला येतात .तीर्थक्षेत्रा सोबत हरेश्वर पर्यटनासाठी प्रसिध्द आहे.श्रीवर्धन ते हरेश्वर 21 किमी अंतर आहे. पुणे ते हरेश्वर 189 किमी व मुंबई ते हरेश्वर 216 किमी अंतर आहे .विशेषतः आठवडा सुट्टी साठी पयर्टक श्रीवर्धन, हरेश्वर व दिवेआगार यांना पसंती देतात.



Post a Comment