म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील देखील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे या मार्गावर प्रवास करणे धोक्याचे झाले आहे वाहन चालकांना वाहने चालवितांना खूप मोठी कसरत करावी लागत असून प्रवाशी वर्ग या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत . म्हसळा बायपास रस्ता , न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज ते म्हसळा बस स्टैंड , दिघी नाका ते पाचगाव आगरी समाज हॉल रिक्षा स्टेंड ते दिघी रोड अशा सर्वच मुख्य वाहतूक रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून अक्षरशः या रस्त्यांची चालन झाली आहे तर काही ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांनी तर तलावाचे रूप धारण केले असून सर्व रस्ते चिखलमय झाले असल्याची वस्तुस्थिती पहावयास मिळत आहे या तलाव रुपी खड्ड्यांमधून वाहन चालकांना अडखळत - अडखळत मार्ग काढावा लागत आहे . या सर्व बिकट परिस्थितीला कंटाळून म्हसळा शहरात शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी , दैनंदिन कामासाठी , बाजारहाट करण्यासाठी ग्रामीण भागातील येणारे नागरिक , बाहेरून येणारे पर्यटक , त्याचबरोबर म्हसळा शहारावाशीय कपाळावर हात मारून खड्ड्यात गेले ते म्हसळा शहरातील रस्ते असे म्हणत आहेत . तर बर्याच महिन्यांपासून ही खडैमय परिस्थिती असल्याने या रस्त्यावर पडलेले खड़े बुजविणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे तर म्हसळा शहरातील खड्ड्यांना वाली कोण ? हा प्रश्न सर्व सामान्य जनतेस पडला आहे .
दिघी पोर्ट अवजड वाहतूकीचा परिणाम...
शहरातील रस्ते दुरुस्ती कोणी करायची हा गंभीर विषय आहे . कारण या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात दिर्घ पोर्टची अवजड वाहतूक सुरु असून दिखी पोर्ट मधून ओव्हर लोड लोखंडी कॉईलची वाहतूक सुरु असल्याने रस्त्यांची पार चाळण झाली आहे . ही वाहतूक थांबविण्यासाठी अनेक राजकीय पक्षांच्या पुढारी व नेतेमंडळी , पदाधिकारी यांनी बर्याच वेळा प्रयत्न केले , लेखी निवेदने दिली आहेत परंतु याचा काहीच परिणाम झालेला नाही . दुसरीकडे महत्वाचे म्हणजे ज्या नगरपंचायत हद्दीतून हे सर्व रस्ते जातात त्या म्हसळा नगरपंचायतीचे प्रशासन व सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक मात्र तेरी भी चूप मेरी चूप ही भूमिका घेऊन हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेऊन गप्प बसलेले आहेत .
नगर पंचायतसह सर्वच प्रशासनाचे दुर्लक्ष...
जनतेचे कैवारी आणि विकासाच्या गप्पा मारणारे कोणताही नगरसेवक या खड्ड्यांच्या बाबतीत काहीच बोलायला तयार नाहीत किंबहुना संबंधित प्रशासनाला जनमताचा विचार करून एखादे साधे लेखी निवेदन द्यायला पुढाकार घेत नसल्याची वस्तुस्थिती आहे . त्यामुळे म्हसळा नागरपंचातीवर एकाच पक्षाची एकहाती सत्ता असून फायदा काय असाही सवाल काही सुजाण नागरिक करीत आहेत . तर म्हसळा तालुका प्रशासन कोणासाठी काम करीत आहे अशी देखील चर्चा शहरात सुरू आहे . संबंधित प्रशासनाचे अधिकारी देखील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे कानाडोळा करीत आहेत असे दिसून येते . एकंदरीत या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना शाळेतील विद्यार्थी , स्थानिक नागरिक , पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे जनतेचा अंत न पाहता जनमताचा आदर करून शहरातील खड्डेमय रस्त्यांची दखल घेऊन स्थानिक प्रशासनाने आतातरी कामाला लागून लवकरात लवकर खड़े भरण्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत

Post a Comment