दिघी : गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यात विविध पोस्टात इंटरनेट व कम्प्युटर आधारीत सर्व यंत्रणा बंद पडल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत . विजेचा लपंडाव व बीएसएनलची वारंवार बंद पडणारी इंटरनेट सुविधा यास जबाबदार असल्याचे पोस्टाच्या अधिकार्यांनी सांगितले . पोस्टात ज्येष्ठ नागरिक आपले महिन्याचे व्याज घेण्यासाठी येत असतात . तसेच स्पीडपोस्ट , रजिस्टर पत्रे पाठविण्यासाठी , टेलिफोन बिले भरण्यासाठी , पोस्टल लाइफ इंशुरन्सचा विमा भरण्यासाठीही लोक येतात . या सर्व सेवांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे . सर्वच उप - टपाल कार्यालयात ( सब पोस्ट ऑफिस ) अपुरा कर्मचारी वर्ग व स्लो इंटरनेटमुळे गेले महिनाभर नागरिकांची कामे खोळंबली आहेत . यामुळे पोस्टात येणाच्या नागरिकांचे हाल होत आहेत . पोस्ट ऑफिस कार्यालयांमध्ये कर्मचारी वर्ग वाढवावा , यंत्रणा उपलब्ध करून द्यावी तसेच समस्यांचे निराकरण करावे मागणी अशी नागरिक करीत आहेत . अगोदर पोस्ट ऑफिसमध्ये संचय पोस्ट हे कम्प्युटर सॉफ्टवेअर सुरू होते . मात्र त्यानंतर कोअर बँकिंगप्रणाली सुरू करण्यात आली असून नवीन सॉफ्टवेअरवर पोस्ट कर्मचार्यांना काम करावे लागत आहे इंटरनेटवर सर्व माहिती टाकून वापर सुरू झाल्याने समस्या निर्माण झाल्याचे बोर्लीपंचतन पोस्ट कर्मचाऱ्यांनी सांगितले . बीएसएनएलचे इंटरनेट कनेक्शन येथे आहे . हे नेट अनेकदा संथगतीने चालते तर बहुतांश वेळा नेट बंद झाल्याने पूर्णपणे कामे खोळंबतात . कोअर बँकिंगचे पिनेकल हे सॉफ्टवेअर वापरले जात आहे नवीन सॉफ्टवेअर व कमी मनुष्यबळामुळे समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले . बीएसएनएलचे नेट सतत बंद पडत असेल तर पोस्ट विभागाने पर्यायी खासगी नेट घ्यायला हवे . नागरिकांची गैरसोय का करता , ज्येष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले .
पोस्टाच्या या गोंधळामुळे खातेदारांची सहनशीलता संपली...
गेल्या अनेक दिवसांपासून आमचे व्याजाचे पैसे मिळत नाहीत व इतर आर्थिक व्यवहाराची कामे पूर्ण होत नाहीत . नेट बंद आहे असे उत्तर दिले जाते . ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला व्याजाचे पैसे घ्यायला पोस्टात जावे लागते . वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर ज्येष्ठांच्या महिन्याचे वेळापत्रक कोलमडून जाते . अंथरूणाला खिळलेले ज्येष्ठ नागरिक दुसर्या व्यक्तीला पैसे घेण्यासाठी पोस्टात पाठवतात मात्र अशा गोंधळामुळे ज्येष्ठांना वेळेवर पैसे मिळत नाहीत असे खातेदारांनी सांगितले . पोस्टाच्या या गोंधळामुळे खातेदारांची सहनशीलता संपली आहे आता आंदोलन करण्याचा इशारा काहींनी दिला आहे . स्पीडपोस्ट वेळेत जाणे आवश्यक आहे . मात्र पोस्ट ऑफिसमध्ये बंद पोस्ट जाणेही बंद .
पोस्टाचे एजंटही कंटाळले...
बोर्लीपंचतन परिसरासतील वीज दोन दिवस गायब आहे . वीज पुरवठा खंडित झाला की पोस्टातील कामावर परिणाम होतो . इंटरनेट व कम्प्युटरवर जी कामे अवलंबून आहेत ती सर्व कामे बंद होतात पोस्टाचे एजंटही या सर्वप्रकाराला कंटाळले आहेत . एजंटकडे जमा झालेले खातेधारकांचे लाखो रुपयांचे चेक पोस्टात जमा होऊ शकलेले नाहीत . नवीन खाती उघडली जात नाहीत . पोस्ट कार्यालयात दुरवस्था झाली आहे . संपूर्ण कार्यलयाला गळती लागली असून ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नाही

Post a Comment