म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा पोस्ट ऑफीसची इमारत म्हणजे सर्कसमधील ' मौत का कुंवा ’ झाली आहे . ३५ वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीचे छत व अन्य अनेक भाग मोडकळीस आलेले आहेत . वेळो - वेळी योग्य मेटेनन्स नसल्याने इमारत कधीही पडण्याची शक्यता आहे अत्यंत धोकादायक या इमारतीत अधिकारी - कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन गेले ग्राहकांची सेवा करीत आहेत . इमारत पडेल या भितीने ग्राहक बाहेरुन आपले काम परस्पर उरकून जातात . कर्मचारी काउंटडाऊन लावून काम करीत आहेत . सदर पोस्ट ऑफीसची इमारत जीवघेणी असली तरी ग्राहकांना आवश्यक पोस्टल सेवा , रजिस्टर , स्पीड पोस्ट , रजिस्टर्ड पार्सल , परदेशांत जाणारी पत्रे , पार्सल विमा पत्रे , डाक , विमा हप्ता , बचत खात्याचा व्यवहार , मनी ऑर्डर , स्पीड मनीऑर्डर , आदी सर्व व्यवहार कर्मचारीवर्गाने बिनदिक्कत सुरु ठेवले आहेत . पोस्ट ऑफीसमध्ये उप - डाकपाल पोस्टल असिस्टंट , एम . टी . एस् . , पोस्टमन असे ७ - ८ कर्मचारी आहेत . रोज ६० - ७० ग्राहकांची ये जा तसेच केलटे , खामगांव , खरसई , कोळवट , मजगांव , चिखलप , गोंडघर , ताम्हने , मेंदडी , पाभरे , साळविंडे , तलवडे , वरवठणे या सबपोस्ट ऑफीसमधील कर्मचाऱ्यांचे येणे जाणे सुरु असते . सदर इमारतीला कधीही धोका होऊन फार मोठा अपघात होऊ शकतो . अधीक्षक व सहाय्यक अधीक्षक डाकघर हे दोघेही तपासणीसाठी बाहेर असल्याने म्हसळा पोस्ट ऑफीस इमारतीबाबत काहीही प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत . पोस्ट ऑफीस कार्यालय व उप डाकपाल निवास स्थानसाठी कोरी जागा देण्यास तयार असल्यास अधीक्षक डाकघर , अलिबागकडे प्रस्ताव पाठवावा , असे संबंधीत विभागाच्या प्रतिनिधीने सांगितले
मला महिन्यातून काही वेळा व्यवसायानिमित्त पोस्टात जावे लागते . मी इमारत कधीही पडेल या भितीने बाहेरुन माझे काम करुन घेते . सार्वजनिक वापरातील ह्या इमारतीची शासनाकडून आपत्तीपूर्व तपासणी होऊन काही गंभीर प्रकार घडायच्या आत कार्यालयाचे स्थलांतर होणे आवश्यक आहे . - - अश्विनी पाटील, म्हसळा

Post a Comment