सर्व जनतेस सूचित करण्यात येते कि, मागील काही दिवसांपासून काही समाज कंटक व्हॉटसप, फेसबुक आदी सोशल मिडियाचे माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली, किवा चोर आले, अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत. तर काही घटनांत खून झाले आहे. त्यातून अशा जमावावर खुना सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जात असून लोकांमध्ये भीती पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मा.पोलीस अधीक्षक रायगड व जिल्हा पोलीसांकडून जनतेस आवाहन करण्यात येत आहे कि, अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा प्रकारचे अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मीडियातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नये.
अफवा पसरविणा-या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊन स्वतःहून कायदा हातात घेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन रायगड पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.


Post a Comment