म्हसळा - चिचोंडेजवळील साकव मोजतोय शेवटची घटका..

 

म्हसळा : रुचिका बोर्ले
म्हसळा तालुक्यातील प्रसिद्ध धरण पाभरे धरणाशेजारी असलेल्या चिचोंडे या गावाच्याजवळ स्मशानभूमीकडे व शेतीकडे जाणाऱ्या साकवाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाला या आहे . साकवाचे बांधकाम ५० वर्षांपूर्वी केले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले . या साकवाच्या डागडुजीसाठी अधिकऱ्यांनी पाहणी करुनही अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही . त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन या साकवावरुन प्रवास करावा लागत आहे . पावसाचा जोरही वाढल्यामुळे हा साकव कोणत्याही क्षणी कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे . जर हा साकव कोसळला तर ५ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटेल अशी भिती व्यक्त होत आहे . या साकवाचा वापर सर्वांनाच होत आहे . ५ गावातील नागरिक ह्याच साकवावरून प्रवास करीत असतात असे असताना त्या साकवाला तडे गेले आहेत आणि तो पडण्याची शक्यता आहे तर साकवाचा काही भाग पडला असून संरक्षक कठडेही तुटून पडले आहेत . पावसाळा सुरु झाला की , या साकवावरून पाणी जाते . पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन दररोज या साकवावरून जात आहेत . या साकवाबाबत चिचोंडे ग्रामस्थांनी लघु पाटबंधारे कार्यालय कोलाड व माणगाव येथे पत्रव्यवहार करूनसुद्धा संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे . पाभरे ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की , साकव पाभरे धरणातील हद्दीत असल्यामुळे ते साकवाचे काम आम्हाला करता येत नाही . त्यामुळे ग्रामस्थांच्या दळण - वळणासाठी महत्त्वाचा असणाया या साकवाबाबत नक्की कोणाला विचारणा करायची असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे २ वर्षांपूर्वी साकव वाहून गेल्यामुळे तलाठ्यांनी येऊन साकवाचा पंचनामासुद्धा केला गेला . साकवाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून साकवाची डागडुजी करणे गरजेचे असल्याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला होता . परंतु , त्यानंतर कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आली नाही . त्यामुळे जर या पावसाळ्यात साकव कोसळून जीवितहानी झाल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहिल , अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे . 

चिचोंडे , आदिवासीवाडी , बौद्धवाडी , चाफेवाडी , या गायरोणे गावचे रहिवाशी आपला जीव मुठीत घेऊन दररोज जात आहेत . पावसाळ्यात शेतकरी आपल्या शेतीच्या कामांसाठी सतत ये - जा करीत असतात . त्याचप्रमाणे जनावरेदेखील त्याच   साकवावरून जात असतात साकवाचे काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
- रामदास कोबनाक, ग्रामस्थ , चिचोंडे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा