प्रतिनिधी : दिघी
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी जेट्टीच्या विकासासाठी चौदा कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे . मच्छी उतरवायला जेट्टी बांधण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले होते . भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या पाठपुराव्याने दिघी कोळीवासीयांसाठी नवीन जेट्टी मंजूर झाली आहे दिघी येथील जेट्टीचे बांधकाम ( ३०x१० मी ) असणार आहे . बोट यार्ड ( ३९० x ४३० मी ) असेल . उतरता धक्का ( २० x १० ) असून सोबत जोडरस्ता , सौर ऊर्जा दिवे , पंप गृह व पाण्याची व्यवस्था म्हणून विंधन विहीर असे बांधकामाचे स्वरूप असणार आहे . रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी १८ जानेवारी २०१८ रोजी दिघी गावाच्या भेटी दरम्यान नूतन जेट्टी व्हावी यासाठी ग्रामस्थांनी जेट्टी संदर्भात प्रस्ताव मंत्रीमहोदयांना दिला होता . त्यावेळी मंत्रीमहोदयांनी ग्रामस्थांना वचन दिले होते , ते त्यांनी पाळले आहे यावेळी पनवेलचे आ . प्रशांत ठाकूर , रायगड जिल्हा अध्यक्ष कृष्णा कोबनाक , संपर्क प्रमुख राजेंद्र राऊत , भाजप युवा मोचचे उपाध्यक्ष अँड . महेश मोहिते , प्रशांत शिंदे या वरिष्ठ नेत्यांनी पाठपुरावा केला . ग्रामस्थ महादेव चेंडूक बाळाराम खेलोजी , मंगेश गुणाजी , बाळकृष्ण पाटील जयराम तांडेल , विठोबा भूनेसर , चंद्रकांत पाटील , नरेश पाटील , चंद्रकांत कोळी , बेडेकर , अखंड समाज गावप्रमुख हरिदास पाटील , पंच कमिटी व सर्व नाखवा , खलाशी संघटना यांच्या पाठपुराव्याने जेट्टी चे स्वप्न पूर्णत्वास येत आहेत . कोंकण किनारपट्टीवर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असला तरी सुविधायुक्त मासेमारी बंदरांची मात्र कोकणात कमी आहे रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे पण संपुर्ण जिल्ल्यात एकही सुसज्ज मासेमारी बंदर उपलब्ध नाही व त्यामुळे श्रीवर्धन , दिघी ते मुरुडपासूनच्या मच्छीमारांना मासेविक्रीसाठी मुंबईतील बंदरापर्यंतचा प्रवास करावा लागतो आहे याचा मोठा आर्थिक फटका मच्छीमारांना बसत आहे जेटीअभावी समुद्रकिनारी मासळी उतरवताना व बोटीत डिझेल , बर्फ चढवताना मच्छीमारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते . मासळी तर पाण्यातील दगडावर उतरवली जाते त्यामुळे अनेक वर्षे मच्छीमारी बोटींसाठी जेटी बांधावी , अशी मागणी इथले मच्छीमार करीत आहेत ; मात्र त्याला आता मंजुरी मिळाली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला . येथील मोडक्या स्थितितील जेटीमुळे समुद्रातुन आणलेल्या मच्छीला उतरवायला जागा मिळत नाही . उशिर झाला तर मच्छी खराब होउन अतिशय कमी भावात विकावी लागत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली . दरम्यान , दिघी बंदराचे संरक्षण करणारी ब्रेकवॉटर वॉल दिवसेंदिवस ढासळत आहे . पावसाळ्यातील उधाणाने त्याची दुरवस्था झाली आहे . पावसाळ्यात लाटाच्या तडाख्यामुळे ती आणखी उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे . अर्धाअधिक भिंत तुटल्यामुळे समुद्राच्या उधाणाच्या लाटा बंदरात घुसण्याची भिती मच्छीमारांना आहे त्यामुळे जेट्टी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत .

Post a Comment