श्रीवर्धन : वार्ताहर
एकेकाळी रायगड विभागात एक नंबरचे उत्पन्न मिळवून देणारे श्रीवर्धन परिवहन आगार महिन्याकाठी तीस ते चाळीस लाख रुपये तोट्यात जात आहे . काही वेळेस आगाराने राज्यात सुद्धा उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांक मिळविला होता . मागील पाच वर्षांपासून श्रीवर्धन आगारात एकही नवीन वस महामंडळाकडून मिळालेली नाही . निमआराम बस पूर्णपणे भंगार झाल्या असुन साध्या बस पेक्षा जास्त किमतीचे तिकीट घेऊन प्रवाशांना सुमर सेवा मिळत आहे . ज्या निमआराम बस जुन्या होतात त्यांना लाल रंग लाऊन पुन्हा आगारात पाठविल्या जातात . अशा बसेस अनेक वेळा रस्त्यामध्ये ब्रेकडाउन होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो . पाच वर्षांपूर्वी आलेल्या परिवर्तन बसेस सुद्धा भंगार झाल्या आहेत . श्रीवर्धन आगारातून मुंबई , ठाणे , पुणे , बोरीवली , भाईंदर , नालासोपारा , कल्याण , बीड , सातारा , मिरज या लांब पल्ल्याच्या मार्गावर दररोज फेऱ्या जात असतात . सातारा , मिरज ह्या बस आंबेनळी घाटातून महाबळेश्वर मार्गे जातात . घाट अत्यंत कठीण असल्याने या बसेस तरी नवीन असाव्या . बीड व पुणे या बस सुद्धा घाटमाथ्यावर जाणार्या असल्याने नवीन असणे गरजेचे आहे . श्रीवर्धन पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येत आहे . तालुक्यातील अनेक नागरिक नोकरी धंद्यानिमीत्त बाहेर असल्याने ते सणासुदीला गावाला बसनेच येतात तरी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी श्रीवर्धन आगाराला नवन बसगाड्या उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे .

Post a Comment