श्रीवर्धन आगारातील शौचालयांचे काम रखडले...


श्रीवर्धन : प्रतिनिधी
एकीकडे एसटी प्रशासन प्रवासी एसटी सेवेकडे वळावेत म्हणून विविध योजना व अभियान राबवत आहे मात्र श्रीवर्धन आगारातील जुन्या शौचालय आणि मुताऱ्यांची झालेली दुरवस्था व नवीन शौचालय व मुताऱ्यांची अपूर्ण कामांमुळे आगारात येणाऱ्या प्रवासी , पर्यटकांची गैरसोय होत आहे . त्यामुळे नाराजी व्यक्त होत असून श्रीवर्धन आगारप्रमुखांनी नवीन शौचालय व मुतारीची कामे पूर्ण करुन ती प्रवाशाच्या सेवेसाठी सुरु करावीत , अशी मागणी करण्यात येत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर , श्रीवर्धन आणि दिवेआगर ही धार्मिक आणि पर्यटनाची ठिकाणे असल्याने भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात बागमांडले ते दिघी परिसरातील नागरिकांची शासकीय कामाकरिता गर्दी होत असून शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असल्याने आगार परिसरात सतत वर्दळ असते . असे असताना श्रीवर्धन आगारातील जुन्या शौचालय आणि मुतारीच्या झालेल्या दुरवस्थेमुळे येथील आगारात येणार्या प्रवासी नागरिक , विद्यार्थी , पर्यटकांची कुंचबना होते . शौचालय व मुताऱ्यांची साफसफाई न झाल्यामुळे शौचाल व मुतारी तुटुंब भरुन दुर्गंधी पसरुन अस्वच्छता पसरलेली आहे . लाखो रुपये खर्च करुन आगाराची दुरुस्ती व सुशोभिकरणाचे काम सुरु असून त्यात नवीन शौचालय व मुताऱ्यांच्या कामाचा समावेश आहे मात्र या नवीन शौचालय व मुताऱ्यांची काम अपूर्ण असल्याने त्या सुरु करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे . नवी शौचालय व मुतारी अद्याप सुरु न झाल्याने आगारात येणाऱ्या नागरिक आणि पर्यटकांना जुन्या , अस्वच्छ शौचालय व मुताऱ्यांमध्ये नाईलाजास्तव नाक मुठीत दाबून जावे लागत आहे . यात प्रामुख्याने महिला व शालेय विद्यार्थ्यांचे खूपच हाल होत आहेत . आगार परिसरातील झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने रात्रीच्या वेळी साप , विंचू तसेच भटक्या कुत्र्यांपासून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे . लोकप्रतिनिधींचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे नाराजी व्यक्त होत आहे . आगारातील या गैरसोयींकडून श्रीवर्धन आगारप्रमुखांनी लक्ष द्यावे व नवीन शौचालय , मुतारी प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु करावी , अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा