श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आदगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या समुद्राच्या संरक्षक भिंतीस अनेक ठिकाणी भगदाडे पडले आहेत त्यामुळे रस्त्यावर अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.या वर्षी मान्सून कोकणात लवकरच सक्रिय झाला आहे . श्रीवर्धन तालुक्यात या आठवड्यात पावसाने सर्वत्र थैमान मांडले आहे .भरतीच्या वेळी समुद्राच्या लाटा रस्त्यावर उतरून अपघाताची शक्यता वेळास आदगाव रस्त्यावर वाढली आहे .
श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आदगाव हा दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे. सर्वा, नानवेल व दिघी ची वाहतूक या मार्गावर वरून होते. आदगाव चा समुद्रात मच्छिमारी करण्यात येते . वेळास ,आदगाव ,सर्वा व नानवेल लोकसंख्येने मोठी असलेली गावे आहेत .दुचाकी व इतर वाहनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे .तसेच वेळास व सर्वा येथील सर्व विदयार्थी शाळेसाठी आदगाव हायस्कुल मध्ये येतात .
श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून पर्यटक श्रीवर्धन ला भेट देण्यासाठी येतात . वेळास या गावी प्रसिद्ध भैरवनाथाचे मंदिर आहे . आदगाव चा समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करत आहे .आदगाव गावात कोळी समाजाचे प्राबल्य आहे .मच्छिमारी हा मुख्य व्यवसाय कोळी बांधव करतात .त्यामुळे आदगाव च्या किनाऱ्यावर अनेक कोळी समाजाच्या बोटी मच्छिमारी करतात .तालुक्यातील लहान मच्छि विक्रीते करणारे आदगाव मधून मासळी खरेदी करतात .त्यामुळे सदर मार्गावर सदैव वाहतुकीची वर्दळ असते.
वेळास ते आदगाव 05 किलो मीटर चे अंतर आहे .रस्त्याच्या रुंदीचा विचार करता अंदाजे 16 फुट रुंदी आहे .तसेच दुतर्फा मातीची साइड पट्टी तीन तीन फुट आहे .रस्त्याच्या डाव्या बाजूस आदगाव चा समुद्र किनारा लाभला आहे.समुद्राच्या पाण्या पासून संरक्षण करण्यासाठी संरक्षण भिंतीची बांधणी करण्यात आले होती .आजमितीस जवळपास तीन किलोमीटर अंतराच्या संरक्षण भिंतीच्या परिसरात अनेक ठिकाणी फार मोठे भगदाडे पडल्याचे निदर्शनांस येत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याचे त्या कडे पुर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते .संरक्षक भिंतीस सुद्धा तडे गेले आहेत. मुख्य रस्त्याच्या बाजूस मोठे खड्डे निर्माण खाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दररोज त्याच रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांना खड्डयांची कल्पना आहे त्यामुळे ते संध्याकाळी जीव मुठीत धरून जातात .परंतु सदरच्या मार्गावर पर्यटनाची गर्दी वाढत आहे त्या कारणे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक जनता रस्त्याच्या कारणांमुळे चिंताग्रस्त आहे .परंतु अद्याप रस्त्याच्या कामास सुरुवात झालेली नाही .
वेळास, आदगाव मार्गे सर्वा या मार्गावर एस टी च्या 12 फेऱ्या नियमित चालतात .तसेच खाजगी वाहतुक करणाऱ्या विक्रम रिक्षा आहेत .तसेच भ्रमंती साठी येणारे पर्यटक यांची संख्या मोठी आहे .त्यामुळे वेळास आदगाव रस्त्याच्या बाजूस असलेले खड्डे लवकर भरण्यात यावे व समुद्राच्या संरक्षक। भिंतीची दुरुस्ती लवकर करावी अशी मागणी स्थानिक लोक करत आहेत.
विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
सार्वजनिक बांधकाम खाते प्रत्येक वेळी समुद्राच्या संरक्षक भिंतीच्या बाजूस माती चा भराव टाकते त्यामुळे सदर ची माती पहिल्या पावसात वाहून जाते .सदर चा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या बाजूस जवळ पास पाच फुटाचे खड्डे पडले आहेत त्यामुळे सदर मार्गावर अपघात होऊ शकतो .बांधकाम खात्याने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे .
-धवल तवसाळकर (समाजसेवक वेळास )
वेळास आदगाव रस्त्याच्या बाजूस असलेल्या समुद्राच्या संरक्षक भिंतीस काही ठिकाणी तडे गेले आहेत .त्याचा अहवाल विभागीय कार्यालयात पाठवला आहे .रस्ता सुयोग्य स्थितीत आहे .संरक्षक भिंतीच्या कामाची मंजुरी आल्या बरोबर कामास सुरुवात केली जाईल तसेच रस्त्याच्या बाजूला पडलेले खड्डे तात्काळ बुजवले जातील .
-पी .टी जेट्टे (अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते श्रीवर्धन)
एस टी च्या जवळपास। 12 फेऱ्या वेळास आदगाव मार्गावर आहेत .आमच्या उत्पन्नाच्या दृष्टीने आदगाव मार्ग महत्वाचा आहे .रस्त्याच्या बाजूस पडलेल्या खड्ड्यामुळे एस टी चालकास मोठया स्वरूपात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर मार्गावरील खड्डे लवकरच बुजवण्यात यावेत .
रवी मोरे (वाहतुक नियंत्रक बोर्ली स्थानक )

Post a Comment