जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले बडतर्फीचे आदेश
पंचक्रोशीत समाधानाचे वातावरण
म्हसळा : अरुण जंगम
म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोळे येथील तथाकथीत एकात्मिक विकास पाणलोट प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणी अनेक वर्षांपासून चौकशी सुरु होती. या प्रकरणातील तक्रारदार एन.के.जाधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. ग्रामपंचायत कोळे येथील पाणलोट भ्रष्टाचार प्रकरणी ज्या सरपंचावर आरोप करण्यात आले होते ते सरपंच अमोल शंकर पेंढारी यांना पदावरून बडतर्फ करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दि.07 जून रोजी दिले आहेत. या आदेशामुळे म्हसळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मधील पाणलोट प्रकरणातील भ्रष्टाचार उघड होणार असून अनेक आजी माजी सारपंचांचे धाबे दणाणले असून त्यांच्यावर देखील टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील कोळे ग्रामपंचायत मधे सन 2011-12 पासून एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्प सुरू करण्यात आले होते. हे प्रकल सुरळीत चालावे म्हणून यावर एक कमिटी नेमण्यात आली आहे या कमिटीचे अध्यक्ष श्री.अमोल शंकर पेंढारी आहेत. अमोल पेंढारी यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावे पाणलोट प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांचे ठेके घेतले आहेत. तसेच अन्य कामांमध्ये देखील भ्रष्टाचार केला असल्याचे आरोप तक्रारदार श्री.नारायण जाधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केले होते. सदर प्रकरणी पंचायत समिती म्हसळा गटविकास अधिकारी यांनी त्यांचा जबाब देऊन सरपंच अमोल पेंढारी यांनी पदाचा गैरवापर केला असल्याचा ठपका ठेऊन पुढील चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय कडे पत्र पाठविले होते. या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी चौकशी करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (ग) व कलम 16 (2) नुसार सरपंच अमोल शंकर पेंढारी हे ग्रामपंचायत कोळे चे सदस्य राहण्यास अनर्ह ठरविण्यात येत आहेत असा आदेश दिला आहे.
------------------------------ --
" या निर्णयामुळे सरपंचाच्या मनमानी, भ्रष्टाचार कारभाराला लगाम लागली असून यापुढे कोळे नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच यातून धढा घेऊन इमानेइतबारे कार्य करतील."
श्री.राजेंद्र विचारे, पंचक्रोशी संघटक
" पाणलोट व सद्दस्थितीत ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार होतच असतो, परंतु मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? सतत पाठपुरावा करणे. सर्वं पुरावे संबंधीत सर्व अधिकारी यांना देऊनही, तीन वर्ष लागतात, निर्णय प्रक्रियेला ! हि खेदाची बाब आहे. यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन पेक्षा, भ्रष्टाचारी माजोर" यामुळे निर्णय प्रक्रिया लवकर व्हावी. शेवटी सत्य हे सत्य असते. म्हसळ्यातली हि पहिली घटना आहे."
नारायण जाधव, तक्रारदार कोळे ग्रामपंचायत
"भ्रष्टाचाराचा समूळ नष्ट करण्यासाठी पंचक्रोशीतील शिलेदारांनी सहकार्य केल्यामुळेच आम्ही भ्रष्टाचारी सरपंचाला नेस्तनाबुत करू शकलो."
डी.टी.विचारे, पंचक्रोशी अध्यक्ष
"कोळे ग्रुप ग्रामपंचायत मधील आजपर्यंत ग्राम पंचायतीच्या बाबतीत घडलेली काळीमा फासणारी दुर्दैवी घटना असून स्वतःच्या पदाचा स्वतःचा पर्यायी स्वताच्या कुटुंबीयांचा उत्कर्ष साधण्यासाठी गैरवापर करणारे असे लोकप्रतिनिधी सरपंच म्हणून लाभले हेच कोळे ग्रुप ग्रामपंचायतचे दुर्दैव आहे. कैलासवासी स्वर्गीय पंचक्रोशी सल्लागार शंकरजी भोगल,
स्वर्गीय दत्तात्रेय पाटील
स्वर्गीय काशिनाथ सावंतयांना हा विजय समर्पित करीत आहोत."
सतिश रा. शिगवण
सचिव - पंचक्रोशी स्थानिक विकास समिती
Post a Comment