म्हसळा : प्रतिनिधी
श्रीवर्धन , हरिहरेश्वर , दिवेआगर , मुरुड आदी विभागांत देवदर्शन आणि समद्रकिनार्यावर सहलीकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात . या भागात राज्यमार्गाला लागून अनेक जोडरस्ते आहेत . काही जोडरस्ते शॉर्टकट असल्याने पर्यटकांना ज्या योग्य ठिकाणी प्रवास करावयाचा आहे , त्या जोडरस्त्यांना दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटकांची दिशाभूल होते . याबाबत लेखी तक्रार म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ , मुंबई कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे म्हसळा दिघी नाका , गोरेगाव पुरार फाटा , पांगरोली देहन फाटा म्हसळा साई चेकपोस्ट , पाभरे फाटा सकलप , धनगर मलई , बाडांचा , कोंझरी , आडी , वेळास , जसवली , वडवली , बोर्ली , दिवेआगर येथील नामोल्लेख केलेल्या जोडरस्त्यांना दिशादर्शक नामफलक लावण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र आणि अन्य राज्यांतून कोकणातील अलिबाग तालुक्यात आलेल्या पर्यटकाला थेट मुरुड , श्रीवर्धन तालुक्यासह पुणे , रत्नागिरी जिल्ह्यांत जायचे असेल , तर या भागात समुद्रमार्गे अनेक जोडरस्ते किंवा कमी अंतराचे रस्ते आहेत ; परंतु या जोडरस्त्यांना दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालवताना रस्ता चुकून त्यांची दिशा बदलते आणि केलेला प्रवास , वेळ , वाहन इंधन वाया जाते . हे टाळण्यासाठी पर्यटकांचा सुखकर प्रवास होण्यासाठी ठिकठिकाणी गाव दिशादर्शक फलक असणे गरजेचे आहे . अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटकांना सतत स्थानिक नागरिकांना विचारपूस करायी लागते . हे टाळण्यासाठी संबधित खाते प्रमुखांनी केलेल्या मागणीची लागलीच दखल घ्यावी , असे महादेव पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे . अशाच प्रकारची मागणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता म्हसळा , श्रीवर्धन यांच्याकडे केली आहे
Post a Comment