म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात मागील चार वर्षापासून बालविकास प्रकल्प अधिकारी पद हे मुख्यपर्यवेक्षिका यांच्याकडे आहे . जवळपास ३५०० बालके असलेल्या म्हसळा तालुक्यातील जबाबदारीचे हे पद रिक्त असल्याने एकात्मिक बाल विकास योजनेचे काम रामभरोसे चालले आहे . परिणामी ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी भागातील लाभार्थ्यांचा सर्वांगीण विकास व कुपोषण मुक्ती यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांवर विपरीत परिणाम होण्याचे संकेत दिसत आहेत.
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे संपूर्ण देशात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सुरु करण्यात आलेला आयसीडीएस हा बहुउद्देशीय कार्यक्रम आहे . बाल्यावस्थेतील काळजी व विकासासाठी त्याचप्रमाणे गर्भवती , स्तनदा माता व किशोरांसाठी एकत्र सेवा देणारा हा देशातील एकमेव एकात्मिक बाल विकास केंद्राद्वारे चालविला जाणारा कार्यक्रम आहे बालकांचा शारिरीक व मानसिक विकास तसेच आरोग्य व पोषण यासंबंधीच्या गरजा एकमेकांवर अवलंबून आहेत व एकमेकाला पूरक असल्याने ३ - ६ वर्षे वयोगटातील बालकांना शासनाच्या माध्यमातून मटकी , लापसी , भात , खिचडी असा प्रथिनेयुक्त व कॅलरीजयुक्त आहार दिला जातो . केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडानुसार बालकांच्या पोषण स्थितीकडे प्रकर्षाने लक्ष देत असले तरीही स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासन याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करीत नसल्याने तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी मागील चार वर्षांपासून रिक्त आहे . पद हे मुख्यपर्यवेक्षिका यांना प्रभारीपद दिल्याने त्यांच्याही कामाचा ताण वाढला असून अंगणवाड्यांना नियमीत भेट देता येत नाही. स्थानिक पातळीवरील अंगणवाडी केंद्र हा एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा प्रमुख आधारभूत उपक्रम असला तरीही म्हसळा तालुक्यामध्ये ७ अंगणवाड्या व १० मिनी अंगणवाड्यांना इमारतीच नसल्याने ह्या ठिकाणच्या काही अंगणवाड्या भाड्याच्या खोलीमध्ये भरतात तर काही ठिकाणी लाभार्थाच नसल्याने तेथे इमारतींची पूर्तता करण्यात आलेली नाही . प्रत्यक्षात तालुक्यातील म्हसळा शहर पोस्ट ऑफीस लेन , काजी मोहल्ला , आंबेत मोहल्ला , वावे मोहल्ला मेंदडी मोहल्ला या अल्पसंख्यांक समाजाच्या वस्तीतील अंगणवाड्यांना व इतर ठिकाणच्या अंगणवाड्यांना इमारतीच नसल्याचे विदारक चित्र आहे . काही अंगणवाड्यांना जागाच मिळत नसल्याने त्याचे काम झाले नाही तर काही ठिकाणी लाभार्थींच नसल्याने तेथे इमारतींची पूर्तता करण्यात आली नसल्याचे माहिती समोर आली आहे तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी हे पद मुख्य पर्यवेक्षिका यांनी स्वीकारल्यापासून कुपोषणाचे प्रमाण कमी होऊन फक्त ८ बालके सॅममध्ये आहेत तर व्हीसीडीसीचे सात केंद्र हे ह्या वर्षापासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी तथा मुख्यपर्यवेक्षिका रेणुका पाटील यांनी दिली .
इमारती नसलेल्या अंगणवाड्या..
मेंदडी मोहल्ला , मेंदडी क्रांतीनगर , म्हसळा पोस्ट ऑफीस लेन , काझी मोहल्ला , बेटकर वाडी , वावे मोहल्ला , आंबेत मोहल्ला.
इमारती नसलेल्या मिनी अंगणवाड्या
सांगवड , कोकबल , मोरवणे कोलवट रातिवणे , , , सरवर , कृष्णनगर सोनघर , लिपणी , ताम्हाणेशिर्के
मुख्य पर्यवेक्षिका मी असल्याने प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे पद माझ्याकडे दिले आहे . सदर पद स्वीकारल्यापासून माझ्याकडून सर्व अंगणवाड्या तपासणी वेळेवर होत आहे . प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकान्याचे कामही चोख बजावत आहे.
-रेणुका पाटील , प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी
चिखलप अदिवासी या विभागात ० - ६ वयोगटातील २६ बालके आहेत . मदतनीस हे पद रिक्त असताना देखील येथे सैम ( तीव्र कुपोषीत ) व मॅम ( मध्यम कुपोषीत ) एकही बालक नाही .
- रिया राजेंद्र जाधव , ( सेविका , चिखलप अदिवासी वाडी )
सदर बालविकास प्रकल्प अधिकारी हे पद मुख्य पर्यवेक्षिका यांच्याकडे दिले असल्याने त्यांच्या कामाचा ताण वाढला असल्याने शासकीय स्तरावरुन हे पद लवकरात लवकर भरले जावे
-वाय . एम . प्रभे ( गटविकास अधिकारी म्हसळा )
जिल्ह्यामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे अनेक पदे रिक्त आहेत . सदर पदांच्या पूर्ततेसाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला आहे .
- अभय यावलकर , मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग

Post a Comment