म्हसळा नगरपंचायचा शिक्षण विभागाच्या गुणवत्ता श्रेणी “अ” मधील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आघात ,
रा.जी.प. शाळा म्हसळा नं. १ ची नवाब कालीन इमारत पाडून नगरपंचायत कार्यालय बनविण्याचा कट
म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा नगरपंचायत रा.जी.प. शाळा म्हसळा नंबर १ च्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आघात करून या शाळेच्या शंभर वर्ष जुन्या नवाब कालीन इमारतीला जमीन दोस्त करून नगरपंचायत चे आलिशान कार्यालय उभारण्याचा कट केला असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की म्हसळा शहरामध्ये हिंदू – मुस्लीम – बहुजन तसेच परदेशी विद्यार्थी शिकलेल्या या नवाब कालीन शाळेला जमीनदोस्त करून म्हसळा नगरपंचायत चे कार्यालय बांधण्यासाठी ठराव नगरपंचायत च्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. म्हसळा शहरात अनेक ऐतिहासिक इमारती आहेत त्यापैकी मराठी मुलांची शाळा हि सुद्धा एक आहे. म्हसळा शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी तत्कालीन नवाबाने अनेक शासकीय इमारती बांधल्या होत्या. यातील प्रत्येक इमारत बांधण्या मागील एक विशिष्ट उद्देश होता. यामध्ये महाल ऑफिस(सध्याचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे) , सरकारी दवाखाना व धर्मशाळा (सध्याचे नवीन ग्रामीण रुग्णालय) यांच्या सहित मराठी मुलांची शाळा (सध्याची रा.जी.प. शाळा म्हसळा नं. १) हि इमारत देखील नवाबाने शंभर वर्षापूर्वी शहरातील व आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बांधली होती. आज म्हसळा शहरात रा.जी.प. शाळा म्हसळा नं. १ व्यतिरिक्त रा.जी.प. उर्दू शाळा, अंजुमन हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा , शाईन उर्दू यांच्या सहित अनेक खाजगी शाळा गेल्या अनेक वर्षात सुरु झाल्या आहेत. तरीही रा.जी.प. शाळा म्हसळा नं. १ चा पट आजही १५५ इतका जास्त आहे. व या शाळेतील शिक्षकांच्या उत्तम अध्यापनामुळे हि शाळा शिक्षण विभागाच्या तपासणीत गुणवत्ता श्रेणी “अ” मध्ये सलग चार वर्षे राहिली आहे. तसेच रा.जी.प. ची प्राथमिक सेमी इंग्रजी माध्यमाची “अ” श्रेणीतील तालुक्यातील हि एकमेव शाळा आहे. यामुळेच म्हसळा शहरातील पालकांसोबत आजू बाजूच्या खेडे गावातील पालकांची आपल्या पाल्यासाठी या शाळेला विशेष पसंती आहे. वर्षागणिक या शाळेचा पट वाढतच आहे. या वर्षी १५५ इतका पट असून यापुढे हा पट वाढणारच आहे. परंतु या शाळेत शिकणाऱ्या व नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार न करता म्हसळा नगरपंचायत च्या नगराध्याक्षासहित सर्वच नगरसेवकांनी हि ज्ञान मंदिराची पवित्र वास्तू जमीन दोस्त करून नगरपंचायत ची इमारत बांधण्याचा अट्टाहास कशाकरिता ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
मी याबाबतीत म्हसळा नगरपंचायत मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांच्या शी बोलून ठेवते की माझ्याशी चर्चा केल्याशिवाय सदर शाळेला धक्का लाऊ नये. - अदिती तटकरे , रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा
रा.जी.प. शाळा म्हसळा नं. १ च्या जागी नगरपंचायत ची नवीन इअमारात बांधण्या संदर्भात सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झाला आहे. परंतु जो पर्यंत या शाळेतील विद्यार्थ्यांची योग्य पर्यायी व्यवस्था केली जात नाही तोपर्यंत या शाळे च्या जागेत कोणतेही काम केले जाणार नाही.- अर्चना दिवे, प्रभारी मुख्याधिकारी, नगरपंचायत, म्हसळा
शाळा व्यवस्थापन समितीस अजूनही याबाबतीत नगरपंचायतचे कोणतेही अधिकृत पत्र मिळाले नाही. जर असे होत असेल तर या शाळेत १५५ विद्यार्थ्यांचा पट आहे. पुढे शहराची लोकसंख्या जशी वाढेल तसा पट हि वाढणार आहे. मग या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? नगरपंचायत ची इमारत बांधण्यासाठी सध्याच्या इमारती सहित अनेक पर्याय उपलब्ध असताना गरीब मराठी मुलांच्या शाळेवर आघात करण्याचा नगरसेवकांचा हट्ट का ?सुशील यादव , शालेय व्यवस्थापन समितीअध्यक्ष , रा.जी.प. शाळा म्हसळा नं. १


Post a Comment