म्हसळा : सुशील यादव
“घर-दार विकू नका, जमिनी- शेतीवाडी विकु नाका आणि नोकरी काम धंद्यासाठी रायगडातील तरुणांनी मुंबईला या” असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना , पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हसळा – श्रीवर्धन दौऱ्या प्रसंगी घेण्यात आलेल्या श्रीवर्धन येथील(मंगळवार १५ मे) पत्रकार परिषदेत म्हसळा- श्रीवर्धन मधील बेरोजगारी बद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केले. युपी, बिहार मधील परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत नोकरी धंद्याकरीता येत असताना रायगडातील तरूणांनी मुंबईत नोकरी धंद्यास यायला हरकत काय ? असा सवाल त्यांनी केला . तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उमेदवार फार कमी किंवा अजिबातच का नसतात ? या प्रश्नाला उत्तर देताना “ अजून माझा पक्ष नवीन आहे, आणि प्रत्येक नवीन पक्षाची सुरुवात अशीच असते “ असे उत्तर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मराठी भाषेतील पाट्यांची सक्ती का? या प्रश्नास उत्तर देताना ठाकरे यांनी सांगितले की “ दक्षिणेतील कडवट पणा आपल्या कडे का नाही ?” असा प्रति सवाल त्यांनी केला. चीन, जापान,फ्रान्स किवा परदेशात जाता तेव्हा तेथील भाषे बद्दल माहिती घेऊनच जाता ना ? मग महाराष्ट्रात येणाऱ्याना सुद्धा मराठी चे ज्ञान असायलाच हवे. आज परदेशातील चित्रपट भारतात येतात तेव्हा ते तामिळ, कन्नड , तेलगु , हिंदी आणि इंग्रजी यां पाचच भाषेमध्ये येतात, मराठीत का नाही येत ? जोपर्यंत हे परदेशी चित्रपट मराठीत भाषांतरीत होऊन प्रदर्शित होत नाही तो पर्यंत पाहणारच नाही असा मराठी बद्दलचा कडवट पणा मराठी माणसात का नाही ? असा रोख ठोक सवाल त्यांनी केला. मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर या मार्गावर टोळ बसविल्यास आपली भूमिका काय असेल ? या प्रश्नाला समर्पक उत्तर न देता केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्यावर ताशेरे ओढून एकेकाळी टोळ प्रश्न घेऊन आक्रमक आंदोलन करणारे राज ठाकरे यांनी या प्रश्नाला बगल दिली. परप्रांतिया कडून एल.इ.डी. मासेमारी बद्दलच्या प्रश्नाबद्दल उत्तर देताना राज ठाकरे यांनी जर प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही तर स्थानिक मच्छिमारांनी या परप्रांतीय मच्छिमारांना मनसे स्टाईल ने धडा शिकवा असा अजब सल्ला दिला. या प्रसंगी राज ठाकरे यांनी म्हसळा – श्रीवर्धन येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याना संघटनात्मक मार्गदर्शन केले व आगामी निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघासहित मनसे जोमाने उतरेल असे सुतोवाच त्यांनी दिले. याप्रसंगी राज ठाकरे यांच्या समवेत नितीन सरदेसाई , जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड ,म्हसळा तालूका अध्यक्ष रवि पाष्टे , फैसल पोपेरे, पाभरे गण अध्यक्ष आनेश कदम यांच्याासहीत अनेक मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज ठाकरे यांना स्थानीक समस्यांविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी हेच प्रश्न सुनील तटकरे याना का नाही विचारत ? असा प्रति सवाल केला. व तटकरे यांच्यावर चौफेर टीका केली. सध्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत निर्णायक असलेली मनसे ची बहुमुल्य १२ मते सुनील तटकरे यांचे पुत्र व या निवडणुकीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना मिळणार नाहीत अशीच काहीशी भूमिका राज ठाकरे याच्या तटकरे यांच्यावरील टीकेवरून दिसून आली.
मनसे अध्यक्षांनी पत्रकारांसाहित , कार्यकर्त्याना साडेतीन तास ताटकळत बाहेर उभे ठेवले. यातील अनेक कार्यकर्ते , स्थानिक नागरिक या कार्यक्रमाच्या आयोजकांवर संतापून राज ठाकरे यांची भेट न घेताच परतले. अनेक श्रीवर्धन- म्हसळा येथील मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याने पक्ष संघटना वाढीसाठी सध्याची मनसे ची वाटचाल खडतर असल्याचे चित्र यावेळी दिसत होते.
म्हसळा नगरपंचायतचे कार्यालय शंभर वर्षा पेक्षा जूनी राजिप ची मराठी मुलांची शाळा पाडून बांधणार असल्याच्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती या शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेने राज ठाकरे यांना निवेदन देऊन केली .
Post a Comment