म्हसळ्यात आंब्याची आवक वाढली ; भाव घसरला. ओले काजूगर , जांभळे आवक झाली कमी ; भाव वधारला

म्हसळ्यात आंब्याची आवक वाढली ; भाव घसरला. ओले काजूगर , जांभळे आवक झाली कमी ; भाव वधारला
म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळ्यातील किरकोळ बाजारात मागील ४ - ५ दिवसांपासून आंब्याची आवक प्रचंड वाढली आहे . त्यामुळे भावात प्रचंड घसरण झाली असून , हापूस - पायरीचे तयार आंबे १००- १५० रुपये प्रती डझन , कच्चे आंबे ८० ते १०० रुपये प्रती डझन या भावाने मिळत आहेत . मात्र ग्राहकांचे प्रमाणही कमी असल्याचे चित्र आहे . बाजारात ओले व भाजलेले काजूगर , जांभळे याची आवकसुध्दा बऱ्यापैकी आहे . ओले काजूगर रुपये १५० ते २०० प्रति शेकडा भाजलेले काजूगर रुपये १०० प्रति शेकडा , तर जांभूळ रुपये ८० ते १०० प्रति किलो या भावाने किरकोळ स्वरुपात विकले जातात. ओले काजूगर जांभळाना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे तर आंब्याला मागणी कमी आहे . बाजारातील अन्य फळ विक्रेत्यांकडे आंबे मिळत असले तरी आदिवासी महिलांनी आणलेल्या मालाला मागणी जास्त आहे आदिवासी महिला आणत असलेले आंबे हे हापूस , पायरी , दुधपेढा , केशर व रायवळ या जातीचे असतात ; परंतु झाडावर पूर्ण तयार झाल्यावर ते काढले जात असल्यामुळे चवीला फारच छान असतात . तर पिकविण्यासाठी कोणत्याचाही रसायनाचा वापर केला जात नसल्याने आरोग्याला ते चांगले असतात , असे चोखंदळ ग्राहकांचे म्हणणे आहे . म्हसळा , कणघर , चिखलप , चिचोंडा पाभरे , कुडतोडी , लेप , चांढरे , मेंदडी , तोंडसुरे या आदिवासी वाडीवरुन आंबा - ओले काजूगर तर जांभळांची आवक मेंदडी कोंड व वाडी वरुन होते . मार्च , एप्रिल व मे या तीन महिन्यांत ओले काजूगर , भाजलेले काजू , आंबे , करवंदे व जांभळांची फार मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्री होत असते . किमान २५ ते ३० लाख रुपयांची उलाढाल होत असावी , असा जाणकारांचा अंदाज आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा